- नरेश डोंगरेनागपूर - तारुण्याच्या उंबरठ्यावर स्वार होऊन आकाश कवेत घ्यायला निघालेल्या युवक-युवतींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना आकाशात नेण्याचे स्वप्न विकायचे अन् इप्सित साध्य झाले की नामानिराळे व्हायचे, असे वारंवार निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे, स्वप्न विकण्याचा गोरखधंदा करणाऱ्या या महाभागावर कारवाई होण्याचे प्रमाण नगण्य असल्याने त्यांच्या आमिषांना बळी पडणारे अनेक युवक-युवती स्वत:च्या घरापासून आणि भवितव्यापासूनही दुरावत आहेत. दिल्ली, नोएडा, गुडगावसारख्या शहरातील कॉल सेंटरमध्ये बसून बेरोजगार तरुण-तरुणींच्या भावनांशी खेळणाऱ्या या टोळीने छत्तीसगडमधील एका युवतीचा असाच स्वप्नभंग केला. या प्रकरणाने हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
नक्सली प्रभाव असलेल्या भागात राहणाऱ्या सपना (वय १९, नाव काल्पनिक) युवतीवर आधीच निसर्गाने अन्याय केलेला. मायबाप दोन्ही दुरावल्यामुळे नातेवाईक, शेजाऱ्यांच्या आसऱ्याने ती कशीबशी वाढली. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या होतकरू सपनाने स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण जीवन जगण्यासाठी 'लर्निंग अन् अर्निंग'ची वाट चोखाळली आहे. सोशल मीडियाची सफर करून कुठे चांगले शिक्षण आणि कुठे चांगला रोजगार मिळतो, हे ती शोधत असते. अशाच एका सफरीत तिला नागपुरातील हवाई सुंदरीचे प्रशिक्षण देणाऱ्या एका संस्थेकडून आकाशी सफर घडविणाऱ्या कंपन्यांमध्ये बारावी पास युवक-युवतींची आवश्यकता असल्याचे कळले. ती जाहिरात वाचून आकाशात झेपावण्याच्या तिच्या स्वप्नांना कल्पनांचे पंख लागले अन् सपनाने जाहिरातीतील नमूद क्रमांकावर कॉल केला. रजिस्ट्रेशन फी च्या नावाखाली शुल्क जमा केल्यानंतर पलीकडच्या व्यक्तीने तिला नागपुरातील 'त्या' कंपनीचे नाव, अर्धवट पत्ता दिला. त्यानुसार, सपना शनिवारी नागपुरात आली. तिने कंपनीचे कसेबसे कार्यालय शोधले. तिथे गेल्यावर 'आकाशी झेपावण्यास साहाय्यभूत करणारा जॉब नव्हे, तर आम्ही ट्रेनिंग देतो', असे सपनाला कळले. या ट्रेनिंगसाठी महागडी फी जमा करावी लागेल, असेही तिला सांगण्यात आले. फी ऐकून गरीब सपनाचे डोके गरगरले. तिला आकाशातून खाली पडल्यासारखे वाटू लागले.
सैरभैर अवस्थेत ती कशीबशी रेल्वे स्थानकावर पोहोचली. विमनस्क अवस्थेत ती घुटमळत असल्याचे पाहून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी तिची वास्तपुस्त केली. तिने आपली स्वप्नभंगाची कथा ऐकविली. आता काय करावे, कठे जावे, कळत नाही. कारण तिकडे आई-वडील नाही, आधार नाही. त्यामुळे भवितव्य अंधकारमय वाटत असल्याचेही पोलिसांना सांगितले. ज्याने तिला आकाशात उडण्याचे स्वप्न दाखविले तो फोन नंबरही सांगितला. पोलिसांनी त्यावर संपर्क केला असता ‘स्वप्न विकणारी मंडळी गुडगाव, नोएडाच्या कॉल सेंटरमधील’ असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी विचारणा करताच त्यांनी ‘आम्ही जॉबची नव्हे, तर ट्रेनिंग देणाऱ्याची माहिती दिली’, असा साळसूद जबाब त्यांनी पोलिसांना दिला.
आता प्रश्न होता, स्वप्न भंग झाल्याने मानसिकरीत्या खचलेल्या निराधार सपनाचा. रेल्वे पोलिसांनी तिच्या गावातील पोलिसांशी आणि त्यांच्या माध्यमातून नातेवाइकांशी संपर्क केला. त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर समुपदेशनाचा डोस देत, खाऊ पिऊ घालून सपनाला वास्तवाची जाणीव करून दिली. रेल्वेचे तिकीट काढून देत तिला तिच्या गावाला रवाना केले.
टोळ्यांचा सर्वत्र सुळसुळाटस्वप्न विकणाऱ्या टोळ्यांचा सध्या सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. केवळ, दिल्ली, मुंबई, गुडगाव, नोएडाच नव्हे, तर विविध शहरांतील गल्लीबोळांत त्यांनी दुकाने थाटली आहेत. ही मंडळी कोवळ्या मनाच्या, स्वप्नाळू जगतात फिरणाऱ्या सपनासारख्या अनेक युवक-युवतींचे रोज स्वप्नभंग करतात. त्यांच्या भावविश्वाला तडे देतात. या मंडळींना तातडीने आवरण्याची गरज आहे. मात्र, कोण आवरणार, असा कळीचा प्रश्न आहे.