लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ज्येष्ठ वकील अॅड. भैयासाहेब धवड आणि त्यांची पत्नी वनिता गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अचानक बेपत्ता झालेल्या धवड दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी अजनी पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास चालविला आहे.अॅड. भैयासाहेब धवड अपघाताच्या विमा दाव्यासंदर्भातील प्रकरणे हाताळत होते. अजनी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या वंजारीनगरातील लक्ष्मीप्रयाग अपार्टमेंटमध्ये धवड दाम्पत्य १४ वर्षांपासून वास्तव्य करीत होते. त्यांना मृणाल नामक मुलगा असून, तो वाशिमला बँकेत नोकरी करतो. सर्व काही व्यवस्थित असताना अचानक धवड दाम्पत्य २९ जुलैच्या रात्रीपासून दिसेनासे झाले. प्रारंभी गावाला, नातेवाईकांकडे गेले असावे, असे समजून सहनिवासी शांत होते. मात्र, चार-पाच दिवसांनंतर अजनीचा पोलीस ताफा त्यांच्या निवासस्थानी आल्याने कुजबूज सुरू झाली. पोलिसांकडून सहनिवाशांना विचारणा होऊ लागल्याने धवड दाम्पत्य बेपत्ता झाल्याचे उजेडात आले. या संबंधाने अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी धवड दाम्पत्याच्या बेपत्ता प्रकरणाची पोलिसांकडे नोंद असून, वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेत पोलीस तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बेपत्ता प्रकरणाने वंजारीनगरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दुहेरी हत्याकांडाची आठवणदोन वर्षांपूर्वी रामेश्वरी चौकाजवळचे एक दाम्पत्य अशाच प्रकारे अचानक बेपत्ता झाले होते. दोन ते तीन महिन्यानंतर या दाम्पत्याचा भूखंड हडपण्यासाठी बिल्डरने त्यांची हत्या करून मृतदेह बुटीबोरी जंगलात पुरल्याचे खळबळजनक वास्तव उघडकीस आले होते, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडली होती, हे विशेष!