नागपूर : मध्य रेल्वेनेनागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला आणि ४८ तासांतच या निर्णयाला आकस्मिक ब्रेकही लावला. यामुळे मध्य प्रदेशातील प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या शहडोल - नागपूर या विशेष गाडीचा श्रीगणेशा मंगळवार, २९ ऑगस्टपासून होणार होता. तर, ४ सप्टेंबरपासून नागपूर - शहडोल एक्स्प्रेस दर मंगळवारी धावणार अशी रितसर घोषणा रविवार, २७ ऑगस्टला मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. विशेष म्हणजे, नागपुरात चांगली आरोग्य सेवा मिळत असल्यामुळे येथे दररोज मध्य प्रदेशमधील विविध गाव-शहरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, खासगी बस किंवा खासगी वाहनाने रुग्णांना येथे आणणे आणि परत घेऊन जाणे मोठ्या खर्चाचे ठरते. त्यामुळे ही मंडळी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे मध्य प्रदेशमधून नागपूरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकडच्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. मध्य रेल्वेने नागपूर - शहडोल - नागपूर ही विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे मध्य प्रदेशातील अनेकांना दिलासा मिळाला होता.
शहडोल ते नागपूर ही पहिली गाडी २९ ऑगस्टला प्रवासाला सुरूवात करेल आणि या मार्गावरील उमरिया, कटनी साऊथ, जबलपूर, शिवनी, छिंदवाडा आणि साैंसर येथे या रेल्वेगाडीचा थांबा राहील, असेही सांगण्यात आल्याने अनेक प्रवासी या गाडीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अचानक काय झाले कळायला मार्ग नाही. आज अचानक दर सोमवारी (नागपुरातून) आणि मंगळवारी (शहडोल) धावणारी ही गाडी रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. कृपया, प्रतीक्षा करा या गाडीला सुरू होण्यापूर्वीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने कोणत्या कारणामुळे घेतला, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, यामुळे प्रवाशांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान, ही नवीन साप्ताहिक गाडी कधी सुरू होणार, तेसुद्धा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही. पुढची सूचना मिळेपर्यंत प्रवाशांनी कृपया प्रतीक्षा करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.