'शिवसेना कोकणवासियांची दिशाभूल करतेय', नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:53 AM2018-07-12T11:53:53+5:302018-07-12T12:07:46+5:30
नाणार प्रकल्प मुद्यावरून विधानसभेत शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नागपूर - नाणार प्रकल्प मुद्यावरून विधानसभेत शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेनाच नाहीतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाणार प्रकल्प मुद्यावरुन रिंगणात उडी घेतली आहे. नाणार मुद्यावर चर्चा करण्याची आमदारांकडून मागणी केली जात आहे. यावेळी सभागृहात विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. तर दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले.
'नाणार'वरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये वादंग
शिवसेना नाणारवासियांची दिशाभूल करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणताच, शिवसेनेच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
'विखे-पाटील यांनी शिवसेनेला शिकवू नये'
नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस आणि काही लोकांना हे बोचले, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यातूनच शिवसेनेविरुद्ध जहरी भाषा बोलण्याचे त्यांनी काम केले. शेतक-यांचा संप मोडण्यात पुढाकार घेणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला शिकवू नये, असेही नीलम गो-हे यांनी यावेळी म्हटले. शिवाय, शिवसेना नाणारवासियांच्या बाजूने असताना फूट पाडण्याचे प्रयत्न करू नये, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
नाणार प्रकल्प धोकादायक - भास्कर जाधव
ग्रीन रिफायनरी आणि न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट एकत्र आल्यास मोठा धोका होऊ शकतो, असे विधान अनिल काकोडकर यांनी वक्तव्य केले होते. याचा गांभीर्याने विचार करावा. जगात कुठेही न्यूक्लिअर पॉवर आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्प एकत्र नाहीत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. ते पुढे असंही म्हणाले की, एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. दुसऱ्या बाजूला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पात एरिअल अंतर २.५ किलोमीटरचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प धोकादायक आहे. हा 17 गावांचा प्रश्न नाही हा संपूर्ण कोकणाचा प्रश्न आहे. कोकणाच्या आजूबाजूला सांगली आणि कोल्हापूर जिल्हेदेखील आहेत. या जिल्ह्यांनाही धोका आहे. सरकारने हट्ट सोडावा. आम्ही कोकणातील लोक जिवंत राहिलो तरच आम्हाला रोजगार मिळेल. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून विरोधी पक्षनेते यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर तात्काळ यावर चर्चा करा.