आॅनलाईन लोकमतनागपूर : हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ७.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक थंड राहिले. सरासरीपेक्षा ५ अंशांनी तापमान कमी झाल्यामुळे शहरात शीतलहर जाणवू लागली आहे.विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. थंड वाऱ्यांचा जोर वाढला आहे. हवामान खात्यानुसार देशाच्या उत्तर भागात होत असलेली बर्फवृष्टी व वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे थंडी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी नागपूरचे किमान तापमान १०.८ अंश होते. बुधवारी त्यात ३ अंशांनी घट आली. ७.८ अंश तापमानासह बुधवार या मोसमातील सर्वात थंड दिवस राहिला. नागपुरात साधारणत: डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी असते. दिवसाचे तापमान मात्र सामान्य राहते. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्यभारताच्या हवामानात बदल आला आहे. मध्य प्रदेशातील पचमढीचे तापमान २ अंशावर पोहचले आहे.नागपुरात या मोसमात १९ डिसेंबर रोजी पहिल्यांदा पारा १० अंशाखाली घसरला होता. या दिवशी किमान तापमान ८.९ अंश सेल्सियसवर पोहचले होते. थंडीचा हा रेकॉर्ड बुधवारी पारा ७.८ अंशांवर पोहचताच तुटला. पारा ८ अंशाखाली गेल्याने शहरात शीतलहर जाणवू लागली आहे.
उपराजधानी गारठली; २४ तासात ३ अंशांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:47 AM
हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ७.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक थंड राहिले.
ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी सर्वाधिक थंडी२९ डिसेंबर १९६८ रोजी नागपुरात ५.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. २९ डिसेंबर २०१४ रोजी हा रेकॉर्ड तुटला. या दिवशी पारा ५ अंशापर्यंत खाली घसरला होता.