योगेश पांडे
नागपूर : एका बहुमजली इमारतीच्या चौकीदाराने तेथील रहिवासी असलेल्या एका ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या घटनेमुळे पुर्व नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असताना अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांअगोदरच एका शालेय शिक्षकाने शाळेच्या प्रयोगशाळेतच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असताना या घटनेने शहरातील पालक चांगलेच हादरले आहेत.
महेश गोपालप्रसाद रहांगडाले (५७) असे आरोपीचे नाव आहे. महेश हा लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीचा चौकीदार आहे. तो त्याच्या पत्नीसह इमारतीच्या तळमजल्यावर बनविलेल्या खोलीतच राहतो. ११ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सायकल चालविण्यासाठी इमारतीच्या खाली उतरली. तिने काही वेळ सायकल चालविली व त्यानंतर ती पार्किंगमध्ये येऊन बसली. त्याचवेळी तेथे महेश पोहोचला व त्याची वाईट नजर मुलीवर पडली. त्याने तिला पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत नेले व तिच्यावर अत्याचार केला. मुलीला यामुळे धक्का बसला व ती रडायला लागली. कुणालाही काही सांगितल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगी रडतच आपल्या घरी गेली व आईला घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून आईवडील दोघेही हादरले व त्यांनी आरोपीला जाब विचारला. त्यानंतर थेट लकडगंज पोलीस ठाणे गाठले व महेशविरोधात तक्रार केली. पोलिसांनी महेशविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.
आरोपीच्या पत्नीनेदेखील केली दमदाटी
आरोपी महेश अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असताना त्याची पत्नी ही बाहेरच उभी होती. मुलगी रडत बाहेर आल्यावर तिने हा प्रकार त्याच्या पत्नीला सांगितला. मात्र त्याच्या पत्नीने नवऱ्याला ओरडण्याऐवजी मुलीलाच शांत राहण्यासाठी दमदाटी केली.
पोलीस अधिकाऱ्यांचे दावे पोकळच
नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला सुरक्षेचे मोठमोठे दावे करण्यात येतात. गुन्हे घटल्याचे सांगत पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःचीच पाठ थोपटवून घेतली. मात्र प्रत्यक्षात वाढत्या महिला अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक असल्याचे चित्र आहे. अगोदर शिक्षक व आता इमारतीच्या चौकीदाराकडूनच असे कृत्य झाल्याने पालकदेखील चिंतेत आहेत.