नागपूर : विजयादशमी व धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त कडेकोट बंदोबस्त असतानादेखील नागपूर २४ तासांतील दोन हत्यांनी हादरले. एका घटनेत प्रॉपर्टी डीलरची त्याच्याच गेस्टहाऊसमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला. तहसील व सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलकरीम गेस्ट हाऊसमध्ये मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यात आली. जमील अहमद (५२) असे मृतकाचे नाव असून त्यांचे मोमीनपुरा येथील रहमान चौकात अलकरीम गेस्ट हाऊस होते. गेस्टहाऊसच्या वरच्या माळ्यावरच जमील त्यांच्या कुटुंबियांसह रहायचे. ते सोबत प्रॉपर्टी डिलिंगची कामेदेखील करायचे. त्यांची मोहम्मद परवेज मोहम्मद हारून (२४, चुडी गल्ली, मोमीनपूरा) याच्यासोबत मागील सहा वर्षांपासून ओळखी होती व दोघेही सोबत प्रॉपर्टीच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करायचे. काही दिवसांपासून त्याचा जमील यांच्याशी एका प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. बुधवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास जमील हे त्यांच्या कर्मचाऱ्यासह गेस्टहाऊसच्या रिसेप्शनवर असताना आरोपी मोहम्मद परवेज तेथे त्याच्या दोन साथीदारांसोबत आला व त्याने प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून जमील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला व आरोपीने खिशातून पिस्तुल काढून जमील यांच्यावर गोळी झाडली. गोळी थेट डोक्यात लागल्याने जमील यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबियांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. जमील यांची पत्नी नाहिदा परवीन जमील अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
१० दिवसांपूर्वी नागपुरात आले अन् संशयाच्या भुताने घेतला महिलेचा बळी
दुसरी घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. अनुसिया उर्फ दिव्या श्यामकिशोर गजाम (२४, शीतला माता चौक, ईपीएफ ऑफीस क्वॉर्टर) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती १० दिवसांअगोदरच पती श्यामकिशोर गजाम (२८, भजियापार, बालाघाट, मध्यप्रदेश) याच्यासह नागपुरात मजुरीच्या कामासाठी आली होती. श्यामकिशोर तिच्यावर चारित्र्यावरून संशय घ्यायचा. यातूनच मंगळवारी रात्री त्यांच्यात वाद झाला आणि संतापलेल्या श्यामकिशोरने दिव्यावर लोखंडी पाईपने वार करत तिला ठार मारले. पत्नी मरण पावल्याचे दिसताच त्याने तेथून पळ ठोकला. इतर मजुरांच्या ही बाब लक्षात आल्यावर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. लक्ष्मीप्रसाद वरखडेच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.