- नरेश डोगरेनागपूर - प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. अमृत भारत योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी आज पत्रकारांशी चर्चा केली. त्यातून हे संकेत मिळाले.
देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर शहरातील रेल्वेस्थानकावरून देशाच्या चारही दिशांमधील विविध प्रांतात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. नागपूरहून बहुतांश मार्गावरच्या रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी असते. मात्र, सर्वाधिक गर्दी मुंबई, पुणे, हैदराबाद आणि भोपाळकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये असते. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र, पुणे, हैदराबाद आणि भोपाळकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत कमी आहे. त्याचमुळे नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळला मोठ्या प्रमाणात खासगी बसेस चालतात. हा अभ्यासवजा अहवाल रेल्वे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे पाठविला असून या तीन शहरासाठी नागपूरहून वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
देशभरातील विविध मार्गावर आणि खासकरून महाराष्ट्रासह, मध्य रेल्वेच्या विभागात वंदे भारतला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तो लक्षात घेता रेल्वे मंत्रालयही विविध रुटवर वंदे भारत ट्रेन चालविण्याच्या तयारीत आहे. त्याचमुळे नागपूरहू पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
मंत्रालयाच्या अखत्यारितील विषयवंदे भारत ट्रेन हा विषय पुर्णत: रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारितील आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेन कुठे सुरू करायची, कधी सुरू करायची, ते तिकडूनच ठरणार असल्याचे मत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी नोंदविले.
तर, मोठा लोड कमी होईलउपरोक्त तीन मोठ्या शहरात नागपूरहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास ईतर रेल्वेगाड्यातील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि रेल्वे प्रशासनावर रिझर्वेशनच्या संबंधाने असलेला मोठा लोड कमी होईल. सध्या नागपूर - बिलासपूर मार्गावर वंदे भारत ट्रेन धावते. या आलिशान ट्रेनला मध्य रेल्वेच्या सर्व वंदे भारतच्या तुलनेत प्रवाशांचा प्रतिसाद सर्वाधिक आहे, हे विशेष !