- मोरेश्वर मानापुरे नागपूर - मंगळवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात पाचदा चढउतार दिसून आली. दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ३०० रुपये, तर प्रति किलो चांदीचे भाव तब्बल २,४०० रुपयांनी वाढले. चांदीचे भाव जीएसटीसह ९६,८२० रुपयांवर पोहोचले असून काहीच दिवसात लाख रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळच्या सत्रात चांदीच्या भावात सोमवारच्या ९०,८०० रुपयांच्या तुलनेत २,८०० रुपयांची वाढ होऊन भाव ९३,६०० रुपयांवर पोहोचले. लगेच्या दुपारच्या सत्रात एक हजार रुपयांची घसरण होऊन भाव ९२,६०० रुपयांपर्यंत खाली आले. दुपारी ३.३० वाजता चांदी ४०० रुपयांनी वाढून भाव ९३ हजारांवर गेले. सायंकाळी ६.३० वाजता चांदीत तब्बल दीड हजारांची वाढ होऊन भावपातळी ९४,५०० रुपयांवर पोहोचली. मात्र, सायंकाळी ७ वाजता चांदीच्या दरात १,३०० रुपयांची घसरण होऊन मंगळवारचे भाव ९३,२०० रुपयांवर स्थिरावले. तीन टक्के जीएसटीसह चांदीचे भाव ९६,८२० रुपयांवर पोहोचले.