गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात मागील सलग सहा महिने नागपूर शहर देशात पहिल्या क्रमांकावर होते. तर फेब्रुवारीअखेर दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यात अव्वल आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती मिळाल्याने नागपूरने दुसरे स्थान मिळविले आहे.देशातील अव्वल ३१ शहरात महाराष्ट्रातील नागपूरसह पाच शहरांचा समावेश आहे. यात नाशिक १३ व्या क्रमांकावर असून पुणे १७,अमरावती २० तर ठाणे २२ व्या क्रमांकावर आहे. मार्च २०१८ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प आहे. यात नागपूर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट टेंडरशुअर व प्रोजेक्ट होम-स्वीट-होम या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागपूर पोलीस आयुक्तालय व स्मार्ट अॅन्ड सस्टेनबल सिटी डेव्हलमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा नागपूर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट राबविला जात आहे.सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट५२० कोटींच्या या प्रकल्पात १०४५ किलोमीटर लांबीचे रस्ते, पोलीस आयुक्तालय व महापालिका क्षेत्रात ७०६ जंक्शनवर ३६७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. १४० वायफाय, ५३ व्हेरीएबल मेसेज साईनबोर्ड, १० एन्व्हायर्न्मेंटल सेन्सर, ५६ ठिकाणी पब्लिक अलाऊन्समेंट यंत्रणा, ५ मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आणि ५ ड्रोन, २० स्मार्ट बिन्स, ६५ सिटी किआॅक्स, ३८३ स्मार्ट लाईट्स, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट ट्रान्सपोर्ट, मनपात सिटी आॅपरेशन सेंटर, पोलीस विभागासाठी कमांड अॅन्ड कंट्रोल सेंटर आदींचा समावेश आहे. यातील बहुसंख्य प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.प्रोजेक्ट टेंडरशुअरप्रोजेक्ट टेंडरशुअर प्रकल्प पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात उभारला जात आहे. ६५० कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे १ लाख १३ हजार लोकांना फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा एकात्मिक पद्धतीने मिळतील.प्रकल्पामुळे १८०० गुन्ह्यांचा उलगडा : सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पात शहरातील ७०६ जंक्शनवर ३६७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने १८०० गुन्ह्यांचा उलगडा झाला. यातील ९० गुन्हे खुनाचे आहेत. पोलीस यंत्रणेला तपासात मोठी मदत झाली आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात मदत झाली.होम-स्वीट-होम प्रोजेक्ट : होम-स्वीट-होम प्रोजेक्ट २२२.०९ कोटींचा आहे. यात एक हजार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उत्कृष्ट दर्जाच्या सोईसुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येणार आहे. भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागात प्रकल्पग्रस्तांसाठी १०२४ सदनिकांचे बांधकाम केले जात आहे. एकसंध काँक्रिट बिल्डिंग, सौरऊर्जा, पावसाच्या पाण्याची साठवण, हरित इमारतीची संकल्पना, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, व्यावसायिक दुकाने, गार्डन, जॉगिंग, पार्किंग आदींचा समावेश आहे.
नागपूर स्मार्ट, राज्यात अव्वल तर देशात दुसऱ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 10:38 AM
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती मिळाल्याने नागपूरने दुसरे स्थान मिळविले आहे.
ठळक मुद्दे ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प प्रकल्पांना गती मिळाल्याने अव्वल रँकिंग