नागपूर : महाराष्ट्रात रेल्वे मेल सर्व्हिस आणि स्पीड पोस्ट हे नागपुरातील दोन्ही कार्यालय उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रात अव्वल ठरले आहेत. हे दोन्ही कार्यालय अव्वल ठरण्याचे सलग दुसरे वर्ष आहे. याशिवाय डाकसेवेत सर्वोत्कृष्ट कार्यासाठी विदर्भ विभागात रोलिंग ट्रॉफी मिळाली आहे.
देशात स्पीड पोस्टचे ९१ कार्यालय आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात पाच आहेत. मुंबई, पुण्यासह अन्य चार मोठ्या स्पीड पोस्ट कार्यालयांना मागे टाकत नागपूरच्या नॅशनल सॉर्टिंग हबने प्रक्रिया, वितरण आणि संकलनात सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. रेल्वे स्टेशन येथील आरएमएसने वेळेचे सर्वोत्तम नियोजन करीत, अन्य कार्यालयांना मागे टाकले आहे. २०२०-२१ मध्ये कोरोना काळात आवश्यक वस्तू एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची गरज असताना, सीआरसी आणि एनएसएचने सर्वोत्तम प्रदर्शन करीत पहिला क्रमांक मिळविला होता.
सर्वांच्या परिश्रमाचे यश
पुणे येथे ३१ मे आणि १ जूनला आयोजित कार्यक्रमात मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते रोलिंग ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळाले. सीआरसी आणि एनएसएच आपल्या सेवांसाठी दुसऱ्या वर्षीही अव्वल राहिले. विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे यश आहे.
- महेंद्र गजभिये, संचालक, पोस्टल सर्व्हिसेस, विदर्भ विभाग.