- नरेश डोंगरे नागपूर - डिझेल नसल्यामुळे सोमवारी नागपुरातील सर्वच एसटी बस आगारातील बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, बस जागच्या जागी उभ्या असल्याने प्रवाशांना प्रवासाचा दुसरा पर्याय शोधावा लागल्याने त्यांची मोठी धावपळ झाली. महिला प्रवाशांना आर्थिक फटकाही बसला.
नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळपासून विविध मार्गावर धावणाऱ्या बसला घेऊन चालकांनी डिझेल पंपावर लाईन लागली. मात्र, पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचे त्यांना कळले. त्यामुळे चालक-वाहक हात चोळत बसले. दरम्यान, विविध मार्गावरच्या बसची वेळ होऊनही बस फलाटावर लागली नसल्याने आणि जी बस लागली तिच्यात पुरेसे डिझेल नसल्याने ती पुढे चालणार नाही, असे कळाल्याने प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला. या संबंधाने प्रवाशांनी एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता अनेकांनी उत्तर देण्याचे टाळले तर काही जणांनी उत्तरासाठी एक दुसऱ्याकडे बोट दाखवत प्रवाशांची बोळवण केली. प्रवाशी संतप्त झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना 'डिझेलचा टँकर आला नाही', असे जुजबी उत्तर मिळाले. त्यानंतर ठिकठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी दुसऱ्या वाहनांचा आधार घेतला मात्र यामुळे त्यांची धावपळ झाली आणि त्यांना खास करून महिला प्रवाशांना आर्थिक फटका बसला. दरम्यान, सायंकाळी ४ वाजता डिझेलचा टँकर आल्यानंतर विविध बसेसमध्ये डिझेल भरून त्या वेगवेगळ्या मार्गावर रवाना करण्यात आल्या.
अनेक प्रवाशांनी घेतला ट्रॅव्हल्सचा आधारनागपूरच्या विविध आगारातून लांब अंतरावर धावणाऱ्या बसेस सकाळीच निघतात. मात्र, सोमवारी सकाळी बस असली तरी डिझेल नसल्याने अनेक ठिकाणच्या बसेस बाहेरगावी जाऊ शकल्या नाहीत. आजुबाजुच्या गावात धावणाऱ्या बसेस तेवढ्या सोडण्यात आल्या. त्यातील अनेक बसेसही उशिरा सोडण्यात आल्या. अनेक मार्गावरच्या बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दूर अंतरावर जाण्याच्या तयारीत असलेल्या शेकडो प्रवाशांना ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागला.
साहेब झोपले आहेत आता...!या संबंधाने अनेक अधिकाऱ्यांकडे लोकमत प्रतिनिधीने फोन केला असता त्यांनी विशिष्ट अधिकाऱ्यांशी बोलण्याचा सल्ला दिला. तर, त्या अधिकाऱ्याकडे फोन केला असता ' साहेब आता झोपले आहे, सकाळी फोन करा' असे उत्तर पलिकडून बोलणारांनी दिले.