वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये इलेक्ट्रानिक बसेस चालविण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे, परंतु त्याला गती मिळालेली नव्हती. डिझेलच्या किमती ज्या पद्धतीने वाढत आहेत, त्यामुळे आता तातडीने अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसून येते. एसटीच्या नागपूर डिव्हिजनला पहिल्या टप्प्यात मेपर्यंत ३० इलेक्ट्रॉनिक बसेस मिळू शकतात. यामुळे एसटीचे भाडेही कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पर्यावरणाला पोषक व ईकोफ्रेण्डली असलेल्या या बसेसमधून धूर निघत नाही आणि आवाजही कमी येईल. इतकेच नव्हे, तर त्या अधिक आरामदायीही असतील. एसटीतील सूत्रानुसार वयोमान झालेल्या व कबाड बनलेल्या बसेस आता सेवेतून हद्दपार केल्या जातील. जवळपास १०० बसेस कबाडमध्ये विकल्या जातील. जुन्या बसेसला डिझेलही खूप लागते आणि त्या एव्हरेजही कमी देतात. याशिवाय प्रदूषण आणि आवाजही अधिक करतात. असेही सांगितले जाते की, सध्याच्या डिझेल बसेसला सीएनजीमध्ये बदलण्याचाही विचार केला जात होता, परंतु हा पर्याय अधिक खर्चित होत असल्याने कमी मेंटनन्सच्या इलेक्ट्रॉनिक बसेसचा पर्याय निवडण्यात आला.