- नरेश डोंगरे नागपूर - प्रवाशांच्या माैल्यवान चिजवस्तू आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या अमरावतीच्या एका चोरट्याला नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद केले. शेख हारूल शेख मोहम्मद (वय ५२) असे आरोपीचे नाव असून तो अमरावतीच्या यासमिन नगरात राहतो.
संधी मिळताच रेल्वेतील प्रवाशांच्या माैल्यवान चिजवस्तू आणि रोख रक्कम लंपास करण्यात सराईत असलेल्या हारूल याने १६ मार्चला ट्रेन नंबर १२१९४ जबलपूर यशवंतपूरम सुपर फास्ट एक्सप्रेसच्या मागच्या जनरल डब्यातून एका प्रवाशाचा मोबाईल चोरला होता. सहाव्या दिवशी २१ मार्चला तो पुन्हा बिलासपूर एक्सप्रेसच्या मागच्या डब्यात सावज शोधू लागला. ही गाडी गुरुवारी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर थांबली. येथे प्रवाशांच्या साहित्याची सुरक्षा करण्यासाठी 'ऑपरेशन अमानत' अंतर्गत कर्तव्यावर असलेले आरपीएफचे पीएसआय एच. एल. मिना, हवलदार नीरजकुमार, धिरज दलाल, दीपा कैथवास आणि जीआरपीचे अमित त्रिवेदी, अमोल हिंगणे तसेच प्रवीण खवसे यांना हारूलचा संशय आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे आरपीएफच्या ठाण्यात आणून त्याला बाजीराव दाखविण्यात आला. यानंतर हारूलने १६ मार्चला जबलपूर यशवंतपूरम रेल्वेगाडीत मोबाईल चोरल्याची कबुली दिली. आज पुन्हा तो सावज शोधत होता, हेदेखिल सांगितले. त्यावरून त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गुन्हे उघडकीस येण्याची शक्यतारेल्वे पोलिसांनी आरोपी शेख हारूलला अटक केली. त्याचे एकूणच वर्तन बघता तो सराईत चोरटा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. त्याच्याकडून यापूर्वीचे गुन्हे उघडकीस येण्याचीही शक्यता पोलिसाणना वाटते. त्यामुळे त्याने यापूर्वी कोणकोणते गुन्हे केले, त्याची चाैकशी केली जात आहे.