निशांत वानखेडे
नागपूर : अवकाश संशाेधन क्षेत्रात नागपूरकर म्हणून अभिमान बाळगावा, अशी भेट राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी संत्रानगरीला मिळाली. संपूर्णपणे नागपूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सॅटेलाईट रविवारी भारतीय अवकाश संशाेधन संस्थेच्या (इस्राे) स्टेशनवरून लाँच करून यशस्वीपणे अवकाशात स्थापित करण्यात आले.
इस्राेतर्फे ब्राझिलच्या ॲमेझाेनिया-१ या व्यावसायिक उपग्रहाला सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकाेटा, आंध्र प्रदेश येथून रविवारी सकाळी १०.२४ वाजता पीएसएलव्हीद्वारे लाँच करून यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आले. ॲमेझाेनियासाेबत इस्राेने इतर १८ उपग्रहांनाही यशस्वीपणे अवकाशात साेडण्यात आले आणि यामध्ये देशातील तीन महाविद्यालयांच्या उपग्रहांचा समावेश हाेता. यात नागपूरच्या जी. एच. रायसाेनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लाे अर्थ ऑर्बिट (जीएचआरसीई-सॅट) उपग्रहाचाही समावेश हाेता. इस्राे प्रमुख के. सिवन यांनी सर्व उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाल्याची घाेषणा केली आणि त्यावेळी रायसाेनीच्या टीमचा आवर्जून उल्लेख केला.
महाविद्यालयाचे संचालक डाॅ. सचिन उंटवाले यांनी सांगितले, रायसाेनी काॅलेजचे चेअरमन सुनील रायसाेनी व कार्यकारी संचालक श्रेयस रायसाेनी यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षी उपग्रह निर्मितीचा प्राेजेक्ट हाती घेण्यात आला. यासाठी बंगळुरूची आयटीसीए व सर्बियाच्या संस्थेशी करार करण्यात आला. त्यानुसार नागपुरातच ग्राऊंड स्टेशन तयार करण्यात आले, ज्याचे ऑनलाईन उद्घाटन इस्राे प्रमुखाद्वारे करण्यात आले. दरम्यान, काेराेनामुळे लाॅकडाऊन लागल्याने प्राेजेक्टच्या मार्गदर्शनात खंड पडेल, अशी भीती हाेती. मात्र विभागाचे प्राध्यापक आणि १२ विद्यार्थ्यांच्या टीमने व्हर्च्युअली मार्गदर्शन घेत नऊ महिन्याच्या परिश्रामतून उपग्रहाची निर्मिती केली. इस्राे प्रमुखांच्या घाेषणेच्या वेळी काॅलेजची संपूर्ण टीम तेथे उपस्थित हाेती. सर्बियाच्या ग्राऊंड स्टेशनवरून उपग्रहाचे सिग्नल मिळताच यशाचा आनंद साजरा करण्यात आला.
- सकाळी १०.२४ वाजता सतीश धवन स्पेस सेंटरवरून उपग्रहाची पीएसएलव्ही-सी ५१ राॅकेटद्वारे लाँचिंग
- ६९०७.९ सेकंदात पृथ्वीपासून ५१२.४ किलाेमीटरवर (लाे अर्थ ऑर्बिट) अवकाशात नागपूरचे उपग्रह स्थापित झाले.
- दुपारी ३.३० वाजता सर्बियाच्या ग्राऊंड स्टेशनवरून उपग्रहाचा पहिला सिग्नल यशस्वीपणे मिळाला.
- नागपूरमध्येच नऊ महिन्यात उपग्रहाची निर्मिती. टीममध्ये १२ विद्यार्थी व विभागाच्या प्राध्यापकांचा समावेश.