लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदयशस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या २२ वर्षीय तरुणाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून मंजूर झालेल्या दीड लाखांचा निधी कमी पडला. नातेवाईकांनी पैसे गोळा करून संबंधित रुग्णालयाच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु लाभार्थी रुग्णाकडून पैसे घेण्यास योजनेच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. परीणामी, शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. सोमवारी त्या तरुणाचा शस्त्रक्रियेविनाच मृत्यू झाला. या घटनेने मृताच्या कुटुंबियांनी जन आरोग्य योजनेवरच आक्षेप घेतला. ही धक्कादायक, घटना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागातील असून मृताचे नाव अकेश लिमजे (२२) असे आहे.प्राप्त माहितीनुसार, अकेशला हृदय विकार असल्याचे निदान एका खासगी हॉस्पिटलमध्ये झाले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अकेशला १० जानेवारी रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. अकेश याच्याकडे दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशन कार्ड असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत त्याचे प्रकरण पाठविण्यात आले. १६ जानेवारी रोजी शस्त्रक्रियेसाठी योजनेतून दीड लाखांचा निधी मंजूर झाला. परंतु ‘क्रॉनिक अॅरोटिक डिसेक्शन’चा रुग्ण असल्याने दीड लाखापेक्षा आणखी एक लाख ८० हजाराचा निधीची गरज होती. या निधीतून आवश्यक असलेले ‘बायोग्लू’, ‘अॅरोटिक व्हाल्व कॉन्ड्यूलट्’ या सारखे आणखी काही महत्वाच्या साहित्याची गरज होती. या साहित्याशिवाय शस्त्रक्रिया करणे अशक्य होते. डॉक्टरांनी याची माहिती नातेवाईकांना दिली, आणि कमीत कमी आणखी ७५ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी पैसे गोळा केले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी यावर आक्षेप घेतला. रुग्णांकडून शस्त्रक्रियेला लागणारे वरचे पैसे घेता येणार नाही, असे सांगितले. यामुळे विभागाने शस्त्रक्रिया थांबवली. शस्त्रक्रियेचा खर्च हा दीड लाखांपेक्षा जास्त येत असल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसेही घेता येत नसल्याने काय करावे हा प्रश्न होता. परीणामी दोन ते तीन वेळा शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेली. अखेर सोमवारी अकेशचा विना शस्त्रक्रिया मृत्यू झाला. यावर अकेशचा मोठा भाऊ अतूल लिमजे यांनी जन आरोग्य योजनेने घेतलेल्या आक्षेपामुळे शस्त्रक्रिया टळली आणि भावाचा मृत्यू झालेचा आरोप केला. या संदर्भात अधिष्ठात्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.