सुरभी शिरपूरकर
नागपूर : याला भेटा हा आहे सिझेन सोहेल खान. नमाज अदा करताना घालण्यात येणारी टोपी घालून सिझेन गणपती बाप्पांची पूजा करतोय. केवळ सिझेनच नाही तर त्याची आई रुही खान आणि वडील सोहेल खान हे देखील गणपती बाप्पांच्या आराध्येत विलीन झाले आहेत.
अनेकदा आपण धर्माच्या नावावर होत असलेली हिंसा आणि द्वेष याबद्दल ऐकत असतो. मात्र अशातच नागपूरच्या रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या या मुस्लीम परिवाराने सर्वधर्म एक आणि सबका मालिक एक याचा खरं उदाहरण जगापुढे मांडलयं.
खान परिवार गणपतीच्या आस्थेत विलीन झालाय. सिझेन हा गेल्या दहा वर्षांपासून गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी करतो. दीड दिवस किंवा पाच दिवस नव्हे तर तब्बल दहा दिवस गणपती बाप्पा सिजनच्या घरी विराजमान असतात. सिझेन पूर्ण श्रद्धेने आणि आस्थेने त्यांची सेवा करतो. सकाळ संध्याकाळची बाप्पांची आरती सिझेनला मुखपाट आहे. बाप्पांसाठी प्रसाद आणि गळ्यात घालणारा हारसुद्धा तो स्वतः बनवितो.
माझ्या आजवरच्या सगळ्या इच्छा बाप्पांनीच पूर्ण केल्या असल्याचं सीझेनने 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तर, आमच्या मुलावर आम्हाला अभिमान असून पूर्ण रितीरिवाजासह गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आम्ही सीझेनला सांगितलं असल्याचं त्याचे वडील सोहेल खान सांगतात. सोबतच सर्व जाती धर्म समभाव असल्याचा संदेशसुद्धा ते देतात.
आजपासून 125 वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी भारतीयांना एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. सर्वधर्मसमभाव असा संदेशसुद्धा टिळकांनी या उत्सवाच्या मार्फत दिला. टिळकांचा हा संदेश नागपूरच्या सिझेन सोहेल खान याने खऱ्या अर्थाने जोपासलाय. तर, सिझेनला त्याचा पूर्ण परिवार, नातेवाईक आणि परिसरातील लोकांचा देखील तेवढाच साथ लाभला आहे. सिझेन आणि बाप्पांची ही मैत्री सर्वधर्मसमभावाचा आणि एकतेचा संदेश देणारी आहे.