नागपूर :स्वाईन फ्लूच्या वाढत्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत १०८ रुग्णांची नोंद झाली असून, ३० टक्के म्हणजे ३३ रुग्णांचे जीव गेले आहेत. धक्कादायक म्हणजे, मेडिकल व एम्स सोडल्यास अद्यापही मेयोसह महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचाराची सोय नाही.
उपराजधानीत एकीकडे गणेश उत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी २४ बेडचा वॉर्ड क्र. १३ राखीव ठेवला आहे. सध्या येथे १२ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर तर चार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. १ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२२ या दरम्यान या वॉर्डात १०८ रुग्णांनी उपचार घेतले, यातील ३३ रुग्णांचा जीव गेला आहे.
कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे ५१ टक्के मृत्यू
नागपूर जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट, २०२२ या दरम्यान कोरोनाचा १८ मृत्यूची नोंद झालीे. १ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२२ या काळात एकट्या मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूचे ३३ मृत्यू झाले. एकूणच कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे ५१ टक्के मृत्यू झाले. हा धोका ओळखण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
स्वाईन फ्लूचे १०३ रुग्ण भरती
शहरासह ग्रामीण व इतर जिल्ह्यातील मिळून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३८६ झाली आहे. यातील १०३ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत. यातील १० रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
आकडेवारी जमा करण्यापुरतीच मनपा मर्यादित
२००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना, १३ वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या एकाही रुग्णालयात या रुग्णांना भरती करण्याची सोय उभी केली नाही. आता तर मेयोनेही जागा नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. यामुळे रुग्णांचा भार एम्स व मेडिकलवर आला आहे. यातही एम्स शहराबाहेर असल्याने सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येत आहेत.
उशिरा निदान मृत्यूचे ठरतेय कारण
डॉक्टरांनुसार, कोरोनाचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेत गंभीर स्वरूपातील कोरोना झालेल्यांमध्ये स्वाईन फ्लूची गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लूचे उशिरा निदान होऊन त्यांना उशिरा उपचार मिळत असल्याने आजाराची गुंतागुंत वाढून मृत्यूचा धोका वाढला आहे.