काटाेल (नागपूर) : शहरातील नगर परिषदेच्या काॅम्प्लेक्समधील गाळ्यासमाेर शुक्रवारी (दि. ३०) सकाळी मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावरील जखमा पाहता त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. मृत व्यक्ती ही तळेगाव (दशासर) असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
राेहित नारायण बेंबळकर (४६, रा. तळेगाव दशासर, ता. धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती) असे मृताचे नाव आहे. काटाेल शहरातील नगर परिषद काॅम्प्लेक्समधील शटर नसलेल्या एका गाळ्यासमाेर मृतदेह आढळून आल्याने पाेलिसांना सूचना देण्यात आली. पाेलिसांनी बारकाईने पाहणी केली असता, त्याच्या हात, पाय, पाठ व छातीवर जबर मारहाण केल्याचे व्रण तसेच डावा पाय माेडल्यागत व ताेंडातून रक्तमिश्रित पाण्यासारखा द्रव बाहेर येत असल्याचे आढळून आले.
पाेलिसांनी लगेच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याचा जबर मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच तसेच याला वैद्यकीय सूत्रांनी दुजाेरा देताच काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार महादेव आचरेकर करीत आहेत.
माेबाईल क्रमांकावरून ओळख पटली
सुरुवातीला मृताची ओळख पटली नसल्याने पाेलिसांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. मृताच्या पॅन्टच्या खिशात पाेलिसांना माेबाईल क्रमांक नमूद असलेला कागदाचा तुकडा सापडला. त्या क्रमांकावर काॅल केला असता, पाेलिसांचा साेहेल इक्बाल दिवाण (३३, रा. माेवाड, ता. नरखेड) याचाशी संपर्क झाला. त्याने पाेलिसांना प्रशांत नारायण बेंबळकर यांचा माेबाईल क्रमांक दिला. प्रशांत यांनी ताे मृतदेह त्यांचा भाऊ राेहितचा असल्याचे सांगितल्याने ओळख पटली.
आराेपीचा शाेध सुरू
राेहितचा मृत्यू जबर मारहाणीने झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला गुरुवार (दि. २९)च्या रात्री मारहाण केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्याला कुणी व का मारले, राेहित काटाेल शहरात का, कसा व कधी आला, त्याला दुसरीकडे मारहाण करून काटाेल शहरात तर फेकले नाही नाही, ताे काटाेल शहरातील कुणाच्या संपर्कात हाेता यासह अन्य प्रश्न सध्या अनुत्तरीत असून, पाेलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वासही पाेलिसांनी व्यक्त केला.