नागपूर - नागपूर विभागात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात रेतीचे घाट आहे. प्रशासनाच्या नोंदी सर्व रेतीघाट बंद आहे. तरीही नागपूर शहरात दररोज शेकडो ट्रक रेती पोहचत आहे आणि बांधकामेही धडाक्याने होत आहे. शहरात ६५ ते ७० रुपये फुट दराने रेती उपलब्ध आहे म्हणजे एका ट्रकामागे ४५ ते ५० हजार रुपये मोजावे लागत आहे. नागपूर विभागात रेती चोरीचा सर्वात मोठा अड्डा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुका आहे. वैनगंगेच्या काठावरील गावागावात रेतीचे साठे असून, ९ घाटावरून रेतीची चोरी सुरू आहे.
प्रशासनाकडून रेती चोरीवर आळा घालण्याऐवजी प्रोत्साहन दिले जात आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर पोलीस, तहसिल प्रशासन रस्त्यावर कारवाई करीत वाहने जप्त केली जात आहे. पण रेती चोरीचे अड्ड्यांकडे दूर्लक्ष होत आहे. पवनीच्या स्थानिक प्रशासनाला प्रत्येक घाटाची माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सद्या पवनी तालुक्यातून चोरीच्या रेतीची वाहतूकीला अडथळा येऊ नये म्हणून एका ट्रकामागे ३२ हजार रुपये एन्ट्री घेतली जात आहे. एन्ट्री गोळा करण्याचे काम तहसिलचेच एक अधिकारी करीत आहे. आतापर्यंत ८४ ट्रकांची एन्ट्री गोळा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या ट्रकांची एन्ट्री दिली नाही, त्यांच्यावर तहसिलच्या पथकाकडून कारवाई होत आहे. सायंकाळी ५ वाजतापासून सुरू होणारी रेतीची वाहतूक सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. तहसिल कार्यालयासमोरून भरधाव ट्रक धावतात.
अधिकाऱ्यांना धमकावल्यानंतरही पोलीसांत तक्रार नाहीरेतीच्या अवैध वाहतूकीवर कारवाईसाठी गेल्यावर पटवारी, मंडळ अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहे. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीसांत तक्रार दिली जात नाही. रस्त्यावर कारवाई करणारे अधिकारी घाटावरील रेतीसाठ्यांवर कारवाईसाठी धजावत नाही. काही गुंड रेती चोरांचे ट्रक साडपल्यानंतर अधिकारी सोडतात आणि छोट्या ट्रान्सपोटरच्या वाहनांवर कारवाई करतात, अशीही ओरड होत आहे. रेतीच्या चोरीमध्ये स्थानिक अधिकारी कोट्यावधीची माया खिशात घालत असल्याने ना जिल्हाधिकारी, ना पोलीस अधीक्षकांपर्यंत तक्रारी जात नाही.
विभागीय आयुक्तांच्या निर्देशालाही केराची टोपलीब्रम्हपुरी तालुक्यातील रेती घाटाच्या संदर्भात स्थानिक सरपंचांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. बोडेगाव घाटाच्या संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल तहसिलदारांना दिला आहे. येथे ५३४ ब्रास अवैध रेती पंचनाम्यादरम्यान आढळली आहे. पण अजूनही घाटमालकावर दंडात्मक कारवाई झाली नाही. विभागीय आयुक्तांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.