नागपूर : अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता २२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार नीळकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके आणि मृत्युंजय सिंह यांनी तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान व २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
काँग्रेसने विश्वासघात केला : झाडे
- काँग्रेसने पदवीधर निवडणुकीत गरजेच्या वेळी पाठिंबा मागितला. आता गरज संपली की, दिलेला शब्द न पाळता विश्वासघात केला. हरत नाही. ताकदीने लढू. पण पुढे आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका, असा इशारा शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी दिला. अशाने काँग्रेसवर कोण विश्वास ठेवेल. शिक्षक भारतीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढेल व निवडणूक जिंकून दाखवू. वेळ येईल तेव्हा शिक्षक भारती याचे उत्तर देईल.
अखेर शिवसेनेची माघार, सुधाकर अडबालेंना काँग्रेसचा पाठिंबा
तीन पक्षांचे बळ मिळाले : अडबाले
- काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यानंतर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले म्हणाले, १८ संघटनांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आता महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने तीन पक्षांचे बळ मिळाले आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होईल व ही जागा पुन्हा विमाशि जिंकून दाखवेल. गंगाधर नाकाडे यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म जोडल्यानंतर आशा सोडली होती. तरीही काँग्रेस नेत्यांनी प्रचार करू असा शब्द दिला होता. त्यामुळे हिंमत होती.
उद्धवजींच्या आदेशाचे पालन केले : नाकाडे
- शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर म्हणाले, दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेश अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीतूनच दुपारी २.२५ वाजता आपल्याला अभ्यंकर यांचा फोन आला व अर्ज मागे घेण्याचा उद्धवजींचा आदेश कळविला. त्या आदेशाचे पालन करीत मी अर्ज मागे घेतला. माझी कुठलीही नाराजी नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी ५ वाजता आपल्याला फोन करून पक्षादेश पाळल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
शिवसेनेचे माथनकर यांचा राजीनामा
- शेवटच्या क्षणी शिवसेनेने माघार घेत काँग्रेसला ही जागा सोडली. नाकाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले, अशी नाराजी व्यक्त करीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या सर्व घटनाक्रमामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. अशाच विचारसरणीमुळे काँग्रेस लयाला चालली आहे. नेते शब्द पाळत नाहीत.
असे आहेत रिंगणातील उमेदवार
१. सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष)
२. प्रा. दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष)
३. डॉ. देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष )
४. राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष -युनायटेड - शिक्षक भारती)
५. अजय भोयर (अपक्ष)
६. सुधाकर अडबाले (अपक्ष- महाविकास आघाडी- विमाशि)
७. सतीश इटकेलवार (अपक्ष)
८. बाबाराव उरकुडे (अपक्ष)
९. नागो गाणार (अपक्ष - शिक्षक परिषद)
१०. रामराव चव्हाण (अपक्ष)
११. रवींद्रदादा डोंगरदेव (अपक्ष)
१२. नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष)
१३. निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष )
१४. नरेंद्र पिपरे (अपक्ष)
१५. प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष)
१६. इंजि. प्रो. सुषमा भड (अपक्ष)
१७. राजेंद्र बागडे (अपक्ष )
१८. डॉ. विनोद राऊत (अपक्ष)
१९. उत्तम प्रकाश शहारे (अपक्ष)
२०. श्रीधर साळवे (अपक्ष)
२१. प्रा. सचिन काळबांडे (अपक्ष)
२२. संजय रंगारी (अपक्ष)