नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील प्रचारात उमेदवार व त्यांच्या संघटनांनी झोकून दिले आहे. यंदाची निवडणूक भाजप व महाविकास आघाडीसाठी विशेष प्रतिष्ठेची झाली आहे. यामुळेच प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क करण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषत: उमेदवारांचे प्राबल्य असलेला जिल्हावगळता इतर जिल्ह्यांतील मतदारांवर पोहोचण्यासाठीदेखील धावाधाव करण्यात येत आहे. प्रचाराच्या नियोजनासोबतच पहिल्या व दुसऱ्या पसंतीच्या मतांचे गणितदेखील मांडण्यात येत आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान आहे. सहा जिल्ह्यांतील एकूण ४० हजार मतदार असून, तब्बल २२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात जास्त १२ उमेदवार हे नागपूर जिल्ह्यातील आहेत, तर पाच उमेदवार वर्धा येथील आहेत. तीन उमेदवार चंद्रपूर, तर दोन उमेदवार भंडारा जिल्ह्यातील आहेत. बऱ्याच उमेदवारांची त्यांच्या जिल्ह्यात चांगली ‘व्होटबँक’ आहे. मात्र इतर जिल्ह्यातील मतदारांचा आकडादेखील मोठा आहे. त्यामुळे त्यांची पहिल्या पसंतीची किंवा दुसऱ्या पसंतीची मते मिळावी यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून विविध माध्यमांतून संपर्क साधण्यात येत आहे.
भाऊ, दुसऱ्या पसंतीचे मत तरी द्या !
निवडणुकीत एकूण मतदानाच्या टक्केवारीवर मतांचा कोटा किती असेल यावर बरेच काही अवलंबून असेल. पहिल्या पसंतीच्या मतांवर कोणताही उमेदवार विजयी होण्याची शक्यता धूसर असल्याने सर्वच उमेदवार दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी नियोजन करत आहेत. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान आणि मतमोजणी होते. एकूण वैध मतांच्या ५० टक्के मते विजयासाठी आवश्यक असतात. त्यासाठी निश्चित केलेला कोटा उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी पूर्ण करू शकला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी होते.