नागपूर : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे नागो गाणार यांना नागपुरात झालेले बंपर व्होटिंग तारणार असा दावा केला जात आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मतदान एकतर्फी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांना झोळीत गेले असून हे दोन जिल्हेच नागपूरची भरपाई करतील, अशी बाजू अडबाले समर्थक मांडत आहेत. भंडारा- गोंदियात सामना अटीतटीचा होईल तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यामुळे वर्धेत भाजपचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणीनंतर गाणार हॅटट्रिक मारतात की परिवर्तन घडेल, हे स्पष्ट होईल.
शिक्षक मतदारसंघात ८६.२३ टक्के बंपर मतदान झाले. ३९ हजार ४०६ मतदारांपैकी ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागपूर जिल्ह्यात १३,४२० मतदान झाले. यापैकी नागपूर शहरात ८ हजार तर ग्रामीणमध्ये ५ हजार मतदान झाले. मतदानानंतर समोर आलेल्या कलानुसार नागपूर शहरात गाणार आघाडी घेतील तर ग्रामीणमध्ये अडबाले पुढे राहतील. शहरात गाणार यांना ४ हजार मतांची आघाडी मिळेल, असा भाजपचा दावा आहे. तर संपूर्ण शहर व जिल्ह्यात अडबाले फक्त ५०० मतांनी मागे राहतील, असा काँग्रेसचा दावा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ६९५७ तर गडचिरोली जिल्ह्यात २९३९ मतदान झाले. या दोन जिल्ह्यात झालेल्या ९८९६ मतदानापैकी किमान साडेपाच ते सहा हजार मते अडबाले यांना मिळतील व नागपूरची भरपाई होईल, असा हिशेब अडबाले समर्थक मांडत आहेत.
भंडारा- गोंदिया निर्णायक
- गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीशी संबंधित शिक्षण संस्थांनी गाणार यांना मदत केली, त्यामुळे ते या जिल्ह्यात एकतर्फी आघाडी घेतील. भंडारा जिल्ह्यात भाजपने जोरात फिल्डिंग लावली, त्याचा फायदा होईल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. तर अडबाले हे गेल्या वर्षभरापासून या दोन जिल्ह्यांच्या संपर्कात होते. भाजपच्या दबावापुढे शिक्षक झुकले नाहीत, त्यामुळे येथेही चित्र वेगळे दिसेल, असा अडबाले समर्थकांचा दावा आहे.
झाडेंची दुसरी पसंती बदलणार समीकरण
- गाणार व अडबाले यांच्या बहुतांश समर्थकांनी दुसऱ्या पसंतीचे मत देणे टाळले आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्या समर्थकांनी मात्र दुसऱ्या पसंतीची मते गाणार यांना दिली असल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कुणीच मतांचा कोटा पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते संबंधित उमेदवाराच्या खात्यात जमा केली जातात. झाडे यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचा गाणार यांना फायदा होईल व ते विजयी होतील, असेही गणित भाजपकड़ून मांडले जात आहे.
सीबीएसई शाळांचा आधार अन् जुनी पेन्शनचे टेन्शन
- यावेळी सीबीएसई शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. या शिक्षकांची मते सुमारे ८ हजार होती. यापैकी ७ हजारांवर मतदान झाले आहे. सीबीएसई शाळांच्या मॅनेजमेंटने भाजप नेत्यांना शब्द दिला व तो पाळला, अशी भाजपला आशा आहे. तर जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने भाजपचे टेन्शन वाढवले आहे. जुनी पेन्शन संघटनेने अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला होता. मागणी करणाऱ्या शिक्षकांनी पेन्शनचा हिशेब घेतला, अशी चर्चा आहे.