नागपूर : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गारठा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. डिसेंबरच्या शेवटी पारा १३ अंशापर्यंत पाेहचल्याने तसे संकेतही मिळाले हाेते. मात्र नववर्षाच्या पहिल्या दिवशी किमान तापमानाने पुन्हा उसळी घेतली. रविवारी १५.६ अंश तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा २.८ अंशाने अधिक आहे. दिवसाचा पारा मात्र सरासरीपेक्षा २.१ अंशाने घटला असून २८.६ अंशाची नाेंद करण्यात आली.
जानेवारी महिना अत्याधिक थंडीचा असताे. या महिन्यात किमान व कमाल दाेन्ही तापमानात घट हाेते. दिवसा सरासरी २९ ते ३० अंश तापमान असते आणि रात्री सरासरी १२.५ अंश तापमान असते. गेल्या दशकभरात अनेकदा जानेवारीमध्ये पारा १० अंशाच्या खाली घसरला आहे. अवकाळी पावसाची शक्यताही या महिन्यात अधिक असते. यावर्षी थंडी पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या सीझनमध्ये म्हणावी तशी थंडी पडली नाही. डिसेंबर महिन्यात ९ व १० तारखेला पारा १० अंशाच्या खाली गेला हाेता. हे दाेन दिवस वगळता नागपूरकरांना फारसा गारठा जाणवला नाही. डिसेंबरच्या बहुतेक दिवशी किमान तापमान १५ ते २० अंशापर्यंत राहिले आहे. २९ व ३० डिसेंबरला ते १३.६ अंशापर्यंत खाली आले हाेते. त्यामुळे नववर्षात थंडी वाढेल, अशी अपेक्षा हाेती.
दरम्यान, नागपूरकरांना अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवताे पण नेहमीची थंडी नाही. पहाटे ४ ते ७ वाजताच्यादरम्यान काहीसा गारठा वाढलेला असताे पण सूर्य निघाल्यानंतर ताेही निघून जाताे. रात्री बहुतेकांच्या घरी पंखा लावून झाेपण्याचीच परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस किमान तापमानात आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात थंडी वाढेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भात गडचिराेली १३.४ अंश वगळता इतर सर्व जिल्ह्यात पारा १५ अंशाच्या आसपास आहे.