- दयानंद पाईकराव नागपूर - आपला न्यूड फोटो पाठवून तरुणीचे न्युड फोटो पाठविण्याचा आग्रह धरणाऱ्या आणि पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या अकोला येथील पोलिस निरीक्षकाविरुद्ध नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव पुढे आल्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यानेच असे वर्तन केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
धनंजय सायरे (५६, रा. धामनगाव, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तो अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. पीडित २२ वर्षीय तरुणी मूळची अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडिलही पोलिस खात्यात आहेत. तरुणीचे वडिल आणि आरोपी धनंजय सायरे हे एकाच बॅचमध्ये होते. त्यामुळे धनंजयचे तरुणीच्या घरी येणे-जाणे होते. घरी ये-जा असल्यामुळे आरोपी धनंजयची तरुणीवर नजर पडली. पुढे तो खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलिस निरीक्षक पदापर्यंत पोहोचला. तरुणीचे एम. टेकपर्यंत शिक्षण झाले असून पोलिस अधिकारी व्हायचे असल्यामुळे ती सध्या नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.
आरोपी धनंजय सायरे याने तरुणीशी मैत्री केली. मागील ५ वर्षांपासून त्यांचे संबंध आहेत. यातून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करु लागला. त्याने तिला आयफोन भेट दिला. तसेच वेळप्रसंगी आर्थिक मदतही केली. आरोपी धनंजय नागपुरात येऊन तिला नेहमीच भेटत होता. परंतु मागील काही दिवसांपासून आरोपी धनंजयने तरुणीला व्हॉट्सअपवर अश्लील मॅसेज पाठविणे सुरु केले. त्याने आपला न्युड फोटो तरुणीला पाठवून तिचा न्युड फोटो पाठविण्याचा आग्रह धरला. त्याचा मॅसेज पाहून तरुणीला आश्चर्याचा धक्का बसला.
तिने आपला न्युड फोटो पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या धनंजयने तिला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. परंतु तिने हॉटेलमध्ये भेटण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवारी सायंकाळी आरोपी धनंजय तरुणीच्या घरी गेला. त्याने तिला शारिरीक संबंधाची मागणी करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार करताच आरोपी धनंजयने आपली पिस्तुल तिच्यावर रोखून तिच्याशी अश्लील चाळे केले. आपण भेट दिलेला आयफोन आरोपी धनंजयने हिसकावला. यामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केल्यामुळे आरोपी तेथून निघून गेला. त्यानंतर तरुणीने नंदनवन पोलिस ठाणे गाठून आरोपी धनंजय विरुद्ध तक्रार दिली. नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नंदनवन पोलिस करीत आहेत.