- योगेश पांडे नागपूर : आठ टन वजनाची लोखंडी जाळी घेऊन सोलापूरच्या दिशेने निघालेला कंटेनरचालक ठकबाज निघाला व त्याने एका व्यावसायिकाला सहा लाखांचा गंडा घातला. त्याने माल नियोजित ठिकाणी न पोहोचवता पोबारा केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अमित शिवशंकर अग्रवाल (३५ सूर्यनगर) यांचे श्याम एंटरप्रायझेस नावाचे दुकान असून ते लोखंडी जाळ्या पुरवतात. त्यांना सोलापूरमधून आठ टन लोखंडी जाळ्यांची ऑर्डर मिळाली होती. त्यांनी त्यादृष्टीने जय ट्रान्स लॉजिस्टिक्स या कंपनीला कंटेनर पाठविण्यास सांगितले. २९ सप्टेंबर रोजी ओडी ०२ बीएफ ५६६० या क्रमांकाचा कंटेनर घेऊन राहुल विश्वकर्मा हा चालक आला. अमित यांच्या कर्मचाऱ्यांनी पावणेसहा लाखांचा माल लोड केला. तो माल २ ऑक्टोबरपर्यंत सोलापूरला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र चालकाने तीन ऑक्टोबर रोजी अग्रवाल यांना फोन करून सोलापूरजवळ कंटेनर खराब झाल्याचे कळविले. त्याने कंटेनर दुरुस्त झाल्याचे दुसऱ्या दिवशी सांगितले व २४ हजार रुपये पाठविण्यास सांगितले.
ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाशी बोलून अग्रवाल यांनी त्याला ऑनलाईन पैसे पाठविले. मात्र त्यानंतर राहुलचा फोन स्वीच ऑफच येत होता. वारंवार प्रयत्न करूनदेखील त्याच्याशी संपर्क झाला नाही व सोलापूरला नियोजित ठिकाणी मालदेखील पोहोचला नाही. तो माल घेऊन फरार झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.