- दयानंद पाईकराव नागपूर - चोरी करण्यापूर्वीच दोन आरोपींच्या धंतोली पोलिसांनी मुसक्या बांधून त्यांना गजाआड केले. ही घटना सोमवारी रात्री १२.२० वाजताच्या सुमारास घडली.लोकनाथ धनराज नरांजे (४८, रा. बारसेनगर, भानखेडा पाचपावली) आणि दिनेश रामलाल बावणे (३१, रा. ढोलसर, सरांडी ता. लाखांदुर, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी रात्री १२.२० वाजता धंतोली ठाण्याचे बिट मार्शल प्रदिप मोहे व हरीष जवाजी हे गस्त घालत असताना त्यांना पाहून दोन व्यक्ती गोरक्षण जवळील फुटपाथवरील पानठेल्याच्या आडोशाला लपले.
बिट मार्शलला संशय आल्यामुळ त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या जवळील काळ्या रंगाच्या बॅगची तपासणी केली असता त्यात एक लोखंडी आरी, दोन आरी ब्लेड, एक छोटा चाकु, पेंचीस, मेनबत्ती, तीन नग ॲक्टीव्हाच्या चाव्या, दोन नगर मोटारसायलच्या चाव्या, एक स्विफ्ट कारची चावी तसेच पर्समध्ये संतोष राजु टोंग या नावाचे आधारकार्ड व दोन एटीएम आढळले. दोन्ही आरोपी शस्त्रासह चोरी किंवा जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आढळल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कलम ३९८, ४०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.