नागपूर : दोन वर्षांपासून निकाल उशिरा लागत असल्याची ओरड होत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने उन्हाळी-२०२३ मधील २२ परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केले. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्यानंतर अवघ्या १० ते ११ दिवसांमध्येच हे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २२ मे पासून सुरुवात झाली आहे. २९ मे पर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ५३ परीक्षा संपल्या आहेत. या ५३ पैकी २२ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. यात बीएफए ७ सेमिस्टर (अप्लाइड आर्ट-न्यू), बीएफए ५ सेमिस्टर (अप्लाइड आर्ट- न्यू), बीएफए ५ सेमिस्टर (पेंटिंग-न्यू), सर्टिफिकेट कोर्स इन रशियन, सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच, सर्टिफिकेट कोर्स इन जर्मन, सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश, डिप्लोमा इन फ्रेंच, डिप्लोमा इन रशियन, डिप्लोमा इन जर्मन, डिप्लोमा इन इंग्लिश, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंग्लिश, डिप्लोमा इन ओएल विशारद -१, ॲडव्हान्स डिप्लोमा इन ओएल प्रज्ञा संस्कृत, ॲडव्हान्स डिप्लोमा इन ओएल विशारद-२, हायर डिप्लोमा इन अरेबिक (मौलवी फाजील), ॲडव्हान्स डिप्लोमा इन अरेबिक (मौलवी), हायर डिप्लोमा इन शास्त्री -१ संस्कृत, हायर डिप्लोमा इन संस्कृत शास्त्री -२, पीजी डिप्लोमा इन व्हिडिओ प्रोग्रामिंग, पीजी डिप्लोमा इन नॅनो सायन्स ॲण्ड नॅनो टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स डिप्लोमा इन अरेबिक (मौलवी आलीम) आदी विविध अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे.