नागपूर : मे महिन्यात २३ तारखेपासून सुरू झालेल्या नवतपाने नावाप्रमाणे अक्षरश: लाेकांच्या नाकीनऊ आणले. रविवारी शेवटच्या दिवशीसुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण असूनही दमट उकाड्याने नागरिकांना चांगलेच छळले. ढगाळीमुळे तापमान मात्र माेठ्या फरकाने खाली घसरले. नवतपा आता संपला आहे व त्याबराेबर उन्हाचा त्रासही संपेल, अशी अपेक्षा करता येईल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते. त्यामुळे बहुतेक जिल्ह्याचे तापमान ३ ते ६ अंशाच्या माेठ्या फरकाने खाली घसरले. नागपूरला शनिवारी ४५.४ अंशावर असलेला पारा रविवारी ४१.८ अंशावर येत सरासरीच्याही खाली गेला. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ६ अंशाने पारा खाली घसरत ४०.५ अंशावर आला. भंडारा, गडचिराेली, गाेंदिया या जिल्ह्यातही कमाल तापमान ३ ते ४ अंशाने खाली येत ४० अंशावर थांबले. चंद्रपूर व अकाेल्यात आंशिक घट झाली. यामध्ये यवतमाळला शनिवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी येऊनही रविवारी तापमान सर्वाधिक ४५ अंशावर वाढले आहे. दिवसाचा पारा घसरला असला तरी रात्रीचे तापमान वधारले असून नागरिकांना रात्री उष्ण लहरींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान घसरले असले तरी सूर्यकिरणांची तीव्रता अधिक हाेती व ढगांमधील बाष्पामुळे दमट उकाड्याचा नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागला. उष्णता नवतपाच्याच तीव्रतेची हाेती. हवामान तज्ज्ञांच्या मते उन्हाळा संपताना मान्सून सुरू हाेण्यापूर्वी दमट उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. आणखी काही दिवस हा त्रास राहिल, असेही सांगण्यात येते.
दरम्यान रविवारप्रमाणे पुढचा संपूर्ण आठवडा विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून साेसाट्याचा वारा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असेल. यामुळे उष्णता थाेडी कमी हाेईल. मात्र उन्हाचा त्रास पूर्णपणे दूर हाेण्यासाठी १२ जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करावीच लागणार आहे.