नागपूर : मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने सर्व तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ फूट उंचीच्या मूर्तींसाठी मनपा कृत्रिम तलाव तयार करणार आहे; पण मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा जास्त असल्यास, मंडळाला मूर्तीच्या विसर्जन स्थळाची माहिती परवानगीसोबतच द्यायची आहे. त्यामुळे ४ फुटांपेक्षा उंच मूर्तीची स्थापना करण्याचा मानस बाळगणाऱ्या गणेश मंडळांना मूर्तीच्या स्थापनेपूर्वीच विसर्जन स्थळ शोधावे लागणार आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी प्रशासनाचा आढावा घेतला. बैठकीत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, अधीक्षक अभियंता व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तलाव संवर्धनाच्या दृष्टिकोनातून शहरातील सर्व तलावांना बॅरिकेडिंग करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचबरोबर गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी झोन कार्यालयात विशेष कक्ष सुरू करून मनपाचा अग्निशमन विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितले. परवानगी देताना मंडळाद्वारे स्थापित करण्यात येणाऱ्या मूर्तीची उंची किती आहे याची नोंद घ्यावी. ती उंची ४ फुटांपेक्षा जास्त असल्यास शहरातील कुठल्याही ठिकाणी ४ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीचे विसर्जन प्रतिबंधित असल्याची माहिती देऊन ते विसर्जन करणार असलेल्या विसर्जनस्थळाची माहिती त्यांच्याकडून नोंदवूनच परवानगी देण्यात यावी, असे आयुक्तांनी निर्देशित केले.
कमी उंचीच्याच मूर्तींची स्थापना करा
गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले असले तरी नागरिकांनी घरगुती गणेशाच्या मूर्ती २ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या बसवू नयेत, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने कमी उंचीच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा व ४ फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जित कराव्यात, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.