गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला मागणीच्या तुलनेत अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाण्यासाठी ओरड सुरु आहे. नळाचे नेटवर्क नसलेल्या शहरालगतच्या वस्त्यांत मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. दरवर्षी टँकरची संख्या वाढतच आहे. ३४२ टँकरद्वारे दररोज १७६२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. एप्रिल महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने हा आकडा २,४०० पर्यंत पोहचला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत ३४२ टँकरद्वारे १ लाख ५८ हजार ५९७ फेऱ्या मारण्यात आल्या. यावर ६ कोटी १२ लाख १८ हजार ४४२ रुपये खर्च करण्यात आला. एप्रिल महिन्यात ७२ हजार २,२७५ फेऱ्या होतील, असा अंदाज जलप्रदाय विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केला. म्हणजेच महापालिकेला शहरालगतच्या पाणीपुरवठ्यावर दर महिन्याला दोन कोटीहून अधिक खर्च क रावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी टँकरवरील खर्चात वाढ झाली आहे. सर्वाधिक १०५ टँकर लकडगंज झोनमध्ये आहेत. या झोनमध्ये टँकरच्या दररोज ६०० फेऱ्या होतात. आसीनगर झोनमध्ये ८७ टँकर धावत आहेत. महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नेहरूनगर झोनमध्ये ३९ तर हनुमाननगर झोनमधील आऊ टर भागात १४ टँकर धावत आहते. प्रत्येक टँकरच्या सरासरी ५ ते ६ फेऱ्या होतात. मात्र मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत टँकची सर्वाधिक संख्या असते. यामुळे फेऱ्या वाढतात.
नेटवर्कच्या भागात ६६ टँकरशहरातील नेटवर्क असूनही अनेकदा पाणीपुरवठा खंडित करावा लागतो. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अशा वस्त्यांतील लोकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात अशा तक्रारी वाढतात. सध्या यासाठी ६६ टँकर लावण्यात आले आहेत.थंडीच्या दिवसात अधिक टँकरफेब्रुवारीच्या तुलनेत जानेवारी महिना अधिक थंडीच्या असतो. या दिवसात पाण्याची मागणी कमी असते. असे असूनही फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात टँकरची संख्या अधिक दर्शविण्यात आली आहे. जानेवारीत ५२ हजार ८४१ टँकर फेऱ्या असून फेब्रुवारी महिन्यात मात्र ४५ हजार ४७८ फेऱ्या दर्शविण्यात आल्या आहेत. म्हणजेच जानेवारी महिन्यात टँकरच्या ७,३६१ फेऱ्या अधिक आहेत. थंडीच्या दिवसात टँकर क से वाढले, हा संशोधनाचाच विषय आहे.