लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अज्ञातस्थळी बसलेल्या सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना ठगविण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या २४ तासात अशाप्रकारचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
सीताबर्डी
हिमांशू राजनाथ सिंग (वय २७) हा युपीचा तरुण शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहतो. तो राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ ऑल प्रॉपर्टी ॲन्ड मॅनेजमेंटमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याचे थ्री जी सीमकार्ड त्याला फोर जी करून घ्यायचे असल्याने त्याने १५ जूनला त्याच्या मोबाईलवरून प्रयत्न सुरू केले. सायबर गुन्हेगाराने त्याला फोर जी करून देतो, अशी थाप मारून १५ जून ते २२ ऑक्टोबर या कालावधीत त्याचा नंबर ब्लॉक केला आणि नवीन सीम ॲक्टिव्हेट करून त्याच्या बँक खात्यातून एकूण ४ लाख १७ हजार २१० रुपये काढून घेतले. ते लक्षात आल्यानंतर सिंगने सायबर शाखेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून शुक्रवारी सीताबर्डी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
एमआयडीसी
गिरडकर ले-आऊटमध्ये राहणारे मंगेश अश्रबा वाघमारे (वय २६) हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. ८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता त्यांना एक फोन आला. तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे, असे सांगून आरोपीने त्यांना मोबाईलवर एक लिंक पाठवली. ती डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार उघड झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
वाठोडा
वाठोड्याच्या राखुंडेनगरात राहणारी ऐश्वर्या राजकुमार गायकवाड (वय २३) हिने १५ मे रोजी ऑनलाईन मोबाईल बुक केला होता. बरेच दिवस होऊनही मोबाईल भेटला नाही. त्यामुळे तिने संबंधित वेबसाईटच्या क्रमांकावर संपर्क केला. आरोपीने तिला एक लिंक पाठवून सहा हजाराचे पेमेंट करण्यास सांगितले. ऐश्वर्या हिने पेमेंट करूनही मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे तिने पुन्हा संपर्क केला असता आरोपीचा तो नंबर स्वीच्ड ऑफ आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ऐश्वर्या हिने वाठोडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.