लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन लुटारुंनी एका तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळचे ५ लाख रुपये हिसकावून नेले. शुक्रवारी दुपारी ११.४५ ते १२ च्या सुमारास लकडगंजमधील अयाचित मंदिराजवळ ही लुटमारीची घटना घडली.नवी शुक्रवारीतील भाटिया यांच्या राजेश सेल्स एजन्सीमध्ये कॉम्प्युटर आॅपरेटर असलेले विशाल कृष्णराव वंजारी (वय ३४) हे आपल्या कार्यालयातून पाच लाखांची रोकड घेऊन शुक्रवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास डिओ दुचाकीने निघाले. ही रक्कम त्यांना पंजाब नॅशनल बँकेच्या दारोडकर चौक शाखेत जमा करायची होती. लकडगंजमधील अयाचित मंदिराजवळच्या गायत्री पॅलेस जवळ वंजारी यांच्या दुचाकीसमोर अचानक एका दुचाकीवर दोन लुटारू आले. काही कारण नसताना या दोघांनी वंजारी यांना शिवीगाळ केली. ‘तुने मुझे कट क्यू मारा‘, अशी एकाने विचारणा करून त्यांचे लक्ष विचलित केले तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांच्या जवळची पाच लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. काही क्षणातच आरोपी पळून गेले. दरम्यान, वंजारीची आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. वर्दळीच्या मार्गावर भरदुपारी ही घटना घडल्याने अल्पावधीतच तेथे मोठी गर्दी जमली. काहींनी वंजारींना डोळ्यात गेलेली मिरची पावडर धुण्यास मदत करून नंतर काय घडले, त्याची माहिती विचारली. वंजारींनी झालेली घटना त्यांना सांगितली. त्यानंतर आपल्या मालकाला माहिती कळवून लकडगंज पोलीस ठाणे गाठले. वंजारीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली. तेथून हाकेच्या अंतरावर गुन्हे शाखेचे कार्यालय आहे. भरदुपारी या कार्यालयाजवळ पाच लाखांच्या लुटमारीची घटना घडल्याने पोलिसांचेही धाबे दणाणले.लकडगंजसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातून लुटारुंची सचित्र माहिती मिळवल्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली. ज्या पद्धतीने ही घटना घडली. त्यानुसार आरोपींना वंजारीच्या किंवा त्यांच्या कार्यालयातील आर्थिक व्यवहाराची माहिती असावी, असा संशय पोलिसांनी बांधला आहे. त्यानुसार, सराईत आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
नागपुरात डोळ्यात मिरची पावडर फेकून भरदुपारी पाच लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:36 AM
दोन लुटारुंनी एका तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळचे ५ लाख रुपये हिसकावून नेले. शुक्रवारी दुपारी ११.४५ ते १२ च्या सुमारास लकडगंजमधील अयाचित मंदिराजवळ ही लुटमारीची घटना घडली.
ठळक मुद्देलकडगंजमधील घटना