नागपूर : गो फर्स्टची उड्डाणे रद्द होत असतानाच अन्य विमान कंपन्यांच्या भाड्यात मनमानी वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशीचे तिकीट भाडे दुपटीहून अधिक करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्यांत पर्यटनासाठी आधीच बुकिंग केलेले प्रवासी त्रस्त आहेत.
जाणकार सूत्रांच्या माहितीनुसाार मुंबईसाठी आकारले जाणारे ४,५०० ते ५,००० रूपये भाडे आता १२,००० ते १८,००० रुपयापर्यंत वाढले आहे. नागपूर विमानतळावरून सर्वाधिक उड्डाणे करणारी विमान कंपनी या संधीचा मोठा फायदा घेत असल्याचे दिसून येते. दोन-तीन दिवसांनंतरचे बुकिंग करूनही २५ ते ३० टक्क्यांनी जादा भाडे आकारले जात आहे.
पॅकेज बुक करणारे विचारताहेत प्रश्न
गो फर्स्टची उड्डाणे रद्द झाल्यानंतर ज्यांनी त्यात प्री-पॅकेज बुकिंग केले आहे. ते प्रचंड नाराज आहेत. त्यांच्यासह ट्रॅव्हल एजंटही अडचणीत आले आहेत. प्रवासी व बुकिंग करणारे ट्रॅव्हल एजंट यांच्यात रकमेसाठी सतत वाद होत आहेत.