पोलिस भरतीच्या मागणीसाठी युवक काँग्रेसची नागपूर ते नाशिक बाईक रॅली
By कमलेश वानखेडे | Published: March 11, 2024 03:14 PM2024-03-11T15:14:57+5:302024-03-11T15:15:40+5:30
या रॅलीच्या तयारीसाठी देवडिया काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली
नागपूर : पोलीस भरतीच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या युवकांना सोबत घेत युवक काँग्रेसतर्फेनागपूर ते नाशिक बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली १२ मार्च रोजी नागपुरातून निघून १४ मार्च रोजी नाशिक येथे दाखल होईल. ही रॅली नाशिक येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भार जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल.
या रॅलीच्या तयारीसाठी देवडिया काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. तीत रॅलीचे नियोजन करण्यात आले. नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ,महाल येथून रॅली सुरुवात होईल. २०० बाईक व ४०० पोलिस भरती प्रशिक्षणार्थी आणि युवक काँग्रेसचे सहकारी रॅलीमध्ये सहभागी होतील. रॅली नागपूर, बुटीबोरी, वर्धा, पुलगाव, मालेगाव, कारंजा लाड, मेहकर, सिंदखेराजा, जालना, संभाजीनगर, गंगापूर, येवला मार्गे नाशिक पोहचेल. नियोजन बैठकीला शहर अध्यक्ष तौसिफ ख़ान, संजू जवाले, राकेश निकोसे, सागर चव्हाण, नयन तरवटकर, मोईज शेख,कुणाल खडगी, अमन लूटे, इरफान काजी, विजय मिश्रा, आदित्य गानार , सार्थक चीचमलकर, अनीकेत बानाइत,रोहित वाग्धारे, सलीम शाह, बाबू ख़ान, प्रफुल्ल ईजनकर, हिमांशु भोंसले, रोहन मसुरकर, अतुल नागपुरे आदी उपस्थित होते.