नागपूर : समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर चार तासांवर आले आहे. मुंबईसुद्धा जवळ आली आहे. परंतु, पुण्याला जायला मात्र वेळ लागत आहे. ही अडचणही आता लवकरच दूर हाेणार आहे. पुणे-अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर असा नवीन ग्रीन फील्ड महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाशीही जोडण्यात येणार असल्याने नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हा रस्ता एमएसआयडीसी बांधणार असून, या दोघांच्याही उपस्थितीत शुक्रवारी नागपुरात केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र यांच्यात करार करण्यात आला. नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाचे उपसचिव मयूर गोवेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते दिनेश नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते. मयूर गावेकर व दिनेश नंदनवार यांनी या करारावर स्वाक्षरी केली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे ऑनलाइन सहभागी झाले होते.
हा रस्ता मागास भागासाठी वरदान ठरेल : गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, हा रस्ता मराठवाड्यातील एकूण मागास व दुष्काळी भागातून जातो. एकूण २५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेला हा रस्ता मराठवाडा या मागास भागासाठी, तसेच उद्योग व पर्यटनासाठी वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथील वाहतुकीची होणारी कोंडी पाहता, या रस्त्याची आवश्यकता होतीच. समृद्धीमुळे मुंबईला पोहोचणे सोपे झाले होते. मात्र, पुण्यापर्यंत पोहोचायला वेळ लागायचा. - हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार असल्याने आता नागपूर ते पुणे अंतरही सहा तासांवर येईल. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्वागत केले. अंशुमाली श्रीवास्तव यांनी आभार मानले.
ग्रीन फिल्ड महामार्गाची मुख्य वैशिष्ट्ये - २३० किमी लांबी- सहा लेन - प्रवेश नियंत्रित - १२० किमी प्रति तास डिझाइन स्पीड- १२७,००० पेक्षा अधिक पीसीयू डिझाइन क्षमता- ३,७५२ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता