लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे शाखा पोलिसांच्या संयुक्त धाडीत ३८ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला.विभागाने गुप्त माहितीच्या आधारे हंसापुरी, हनुमान मंदिराजवळील ताकोते निवास येथे दीपक श्रावण तराळे याच्याकडून टाकलेल्या ९,३६० रुपयांचा विमल पानमसाला, १५,२८८ रुपयांचा राजश्री पानमसाला, ८,५५० रुपयांचा पानबहार पानमसाला आणि ४,७८८ रुपये किमतीचा केपी ब्लॅक लेबल-२ हा सुगंधित तंबाखू असा एकूण ३७,९८६ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला. या साठ्यातून एकूण चार नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित साठा अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार जप्त करून ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचेनागपूर विभागीय सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, प्रफुल्ल टोपले, विनोद धवड आणि गुन्हे शाखा युनिट-३ लकडापूल नागपूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी केली.जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत विभागाला माहिती द्यावी आणि जनतेने आणि विशेषत: युवकांनी अशा पदार्थांचे सेवन करू नये, असे शशिकांत केकरे यांनी म्हटले आहे.
नागपुरात ३८ हजारांचा तंबाखू व पानमसाला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:14 AM
अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे शाखा पोलिसांच्या संयुक्त धाडीत ३८ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई