नागपूर : ‘क्रिप्टो करन्सी’च्या योजनेत पैसे गुंतविले तर दुप्पट परतावा मिळेल अशी बतावणी करून चार आरोपींनी एका व्यापाऱ्याला १.६० कोटीचा गंडा घातला. आरोपींमध्ये चर्चित झाम बिल्डरचादेखील समावेश आहे. अंबाझरी पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
विनोद गुप्ता (५७, वर्धमाननगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर किशोर हंसराज झाम (५८, राजाबक्षा), देवांश किशोर झाम (राजाबक्षा), संतोष अंबादास लांडे (सोनेगाव) व मंगल तिवारी (दाभा) हे आरोपी आहेत. गुप्ता यांचा विक्रीचा व्यवसाय आहे. विनोद यांची एका मित्रामार्फत जमीन विक्रीच्या निमित्ताने किशोर झाम याच्याशी ओळख झाली होती. पुढे दोघांची चांगली मैत्री झाली. विनोदला प्रभावित करण्यासाठी झामने त्याच्या उमरेड रोडवर बांधकाम सुरू असलेला बंगला दाखवला. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांना कॉर्बिट क्रिप्टो करन्सीच्या योजनेबाबत माहिती देण्यात आली. मला स्वत:ला त्यातून १ कोटी रुपयांचा फायदा झाला असा दावा झामने केला होता.
सहा महिन्यांत गुंतविलेले पैसे दुप्पट होतात, अशी त्याने बतावणी केली. गुप्ता यांनी झामवर विश्वास ठेवला व टप्प्याटप्प्याने १.६० कोटी रुपये दिले. मात्र त्यांनी कुठलाही परतावा गुप्ता यांना दिला नाही. गुप्ता यांनी त्यांना वारंवार विचारणा केली असता आरोपींनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर कंपनी बंद पडल्याचे सांगत हात वर केले. गुप्ता यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर गुप्ता यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात येत आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
झामने घेतली होती पैसे ‘डबल’ची गॅरंटी
किशोर झामने गुप्ता यांना जाळ्यात ओढताना पैसे दुप्पट होतील याची गॅरंटीच घेतली होती. कंपनीचा मालक कर्नाटकमधील गुलबर्गा येथील हबीब हा असून तो माझा चांगला मित्र आहे अशी बतावणी झामने केली होती. त्याला इतर आरोपींनी दुजोरा दिला होता. मंगल तिवारी हा वेळोवेळी लॅपटॉपमधून गुप्ता यांना त्यांच्या गुंतवणुकीवर किती नफा झाला हे दाखवायचा. त्यामुळे त्यांना संशय आला नाही व ते आणखी पैसे गुंतवत गेले.