लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक काळात मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. जमिनीपासून आकाशालाही गवसणी घातली. पण, आई-वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलगाच पाहिजे, ही समाजाची परंपरा. आजच्या काळात मुली अनेक ठिकाणी ही परंपरा मोडताना दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग बुधवारी नागपुरातील गंगाबाई घाटावर सर्वांनी अनुभवला. नेताजीनगरातील गजानन तकीतकर यांच्या सात मुलींनी परंपरा डावलून वडिलांना खांदा देत भडाग्नी दिला.पारडी परिसरातील नेताजीनगर येथील गजानन गोविंदराव तकीतकर (८०) यांचे ३ सप्टेंबरला निधन झाले. ते रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मुलगा नसून सात मुली आहेत. या सातही मुलींचे लग्न झाले आहे. या मुली नागपुरात, भंडारा आणि दिल्लीत राहतात. वडिलांच्या निधनाची वार्ता कळताच वंदना झोडे, संगीता पिसे, योगिता भलमे, अरुणा चांदेकर, करुणा बोरकर, संध्या आगाशे या सहा मुली त्यांच्या घरी पोहोचल्या. तर दिल्ली येथे राहणारी मुलगी राखी सातोने ही येण्यासाठी वेळ असल्यामुळे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी ४ सप्टेंबरला करण्याचे ठरविण्यात आले. दुसऱ्या दिवशी दिल्लीतील मुलगी आल्यानंतर सातही मुली अंत्यसंस्कारासाठी पुढे आल्या. सात बहिणींनी वडिलांना खांदा दिला, तर एका बहिणीने आकटं पकडले. गंगाबाई घाट येथे अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर सातही भगिनींनी वडिलांच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. तकीतकर यांच्या मुलींनी वडिलांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करून मुलीही मुलाचे कर्तव्य बजावू शकतात, हे समाजाला दाखवून दिले आहे.
नागपुरात परंपरा डावलून मुलींनीच केले वडिलांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:39 PM