नागपूर : जिल्ह्यातील सोलर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा देखील समावेश आहे. सकाळची पहिली शिफ्ट सुरू असताना हा अपघात झाला. त्यात आरती निळकंठ सहारे या 20 वर्षीय तरुणीचा देखील मृत्यू झाला आहे. ती नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कामठी मासोद येथील रहिवासी होती.
2019 साली ती सोलर इंडस्ट्रीज मध्ये कामाला लागली होती आणि तेव्हापासून नियमित सेवेत होती. विशेष म्हणजे आरती ही तिच्या कुटुंबासाठी आधारस्तंभ होती आणि एका मुलाचे कर्तव्य ती पार पाडत होती. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे वडील आणि आई दोघेही अपंग असून तिने लहान बहिणीचे लग्न लावून दिले. आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी तिने काम करण्याचा निर्णय घेतला होता.
रविवारी तिची सुट्टी असताना देखील कामावर बोलवण्यात आल्यामुळे ती सकाळी साडेसहा वाजता पोहोचली. मात्र कोळसा खाणींसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या युनिटमध्ये स्फोट झाल्याने ती अडकली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.तिच्या मृत्यूची माहिती कळताच तिचे आजारी वडील नीलकंठ सहारे यांना मोठ्या धक्का बसला आहे. ते घटनास्थळी दाखल झाले असले तरी त्यांना आज प्रवेश मिळाला नसल्याने त्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. कमीत कमी माझ्या मुलीचा मृतदेह तरी मला पाहू द्या अशी वेदना ते बोलून दाखवत आहेत. तिच्या मृत्यूमुळे तिच्या गावातील ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले असून मृतकांना कंपनीने दुप्पट मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.