लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.गुरुवारी सकाळी कडक उन्ह पडले होते. या दरम्यान काही काळ शहराच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासोबत पाऊस आला. लक्ष्मीनगर झोन कार्यालयासमोरील मार्गावर झाड आडवे पडले. या सोबतच, शंकरनगरमधील हल्दीराम प्रतिष्ठानसमोरील मार्गावर आणि बजाजनगरातील बास्केटबॉल ग्राऊंडजवळील प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराजवळही एक झाड पडले. या घटनांमध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही. अभ्यंकर नगरात आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यालयासमोरील उद्यानाची भिंत पडली. या भिंतीला लागूनच एक वाहन पार्क करण्यात आले होते. त्याचेही भिंत पडल्याने बरेच नुकसान झाले. स्वावलंबी नगरात नागोबा मंदिराजवळही एक झाड कोसळले. या घटनेतही कसलेच नुकसान झाले नाही. सुमारे तासभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. अनेक ठिकाणचे आरयूबीदेखील पाण्याने तुडुंब भरले होते. यामुळे वाहनचालकांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागला. यातून जाणारे अनेक आॅटो आणि दुचाकी पाणी गेल्याने बंद पडले होते.पुढचे तीन दिवस असेच वातावरण?अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत बदललेल्या वातावरणामुळे पुढील तीन दिवस उन्ह, ढगाळी वातावरण आणि पाऊस असे चित्र राहण्याची शक्यता आहे. ६ किंवा ७ जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जोरदार पावसाची सूचना नाही; मात्र सकाळी ऊन तर सायंकाळी पाऊस असे काहीसे संमिश्र वातावरण या काळात अनुभवास येण्याची शक्यता आहे.एम. एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्रउप्पलवाडीमध्ये अडथळाकामठी रोडवर उप्पलवाडी येथे सुरू असलेल्या आरयूबीच्या दुसºया भागाचे काम अपूर्ण आहे. तयार करण्यात आलेला नवा आरयूबीदेखिल व्यवस्थित बांधलेला नाही. यामुळे या भागात नेहमीच पावसाचे पाणी साचते. नव्या आरयूबीमध्ये खड्डे पडले असून त्यात पाणी साचते. यातून जाणारे वाहन धोकादायकपणे हेलकावे खाते. या वर्दळीच्या मार्गालगत करण्यात आलेल्या खड्ड्यांमधील वाहून आलेली वाळू आणि माती येथे जमा होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्री वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नाही. पावसामुळे वाहने अडकून पडण्याचा अनुभव येथे नवा नाही. या भागात अद्यापही फोरलेनिंगचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे वाहतुकीला बराच अडथळा होत आहे.
नागपुरात वादळी पावसात झाडे कोसळली, भिंती पडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 9:08 PM