निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील घनदाट हिरवळ केवळ पाहण्यास किंवा तेथे फिरण्यासाठी आल्हाददायक नाही तर या झाडांनी खऱ्या अर्थाने पर्यावरण शुद्ध ठेवण्याचे काम केले. या परिसरातील ७००० झाडांनी गेल्या ६० वर्षात वातावरणातील ६ कोटी ८६ लाख किलोग्रॅम कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतला आहे. म्हणजे किती प्रदूषण कमी केले याचा विचार करा. एवढेच नाही तर नागरिकांसाठी या काळात १० अब्ज लिटर ऑक्सिजन बाहेर सोडला आहे. येत्या २०५० पर्यंत ३० वर्षात ३ काेटी ४२ लाख किलाेग्रॅम कार्बन शाेषून घेतला जाणार आहे.
माजी वन्यजीव वार्डन जयदीप दास यांनी लाेकमतशी बाेलताना या मुद्द्याकडे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी आकडेवारी सादर केली आहे. एक एकरातील झाडे एका वर्षात २.६ टन म्हणजेच २६०० किलाे कार्बन डाय ऑक्साईड शाेषून घेतात. इंटर माॅडेल स्टेशनचा प्रकल्प प्राथमिक टप्प्यात ५५ एकरमध्ये पसरला आहे. या हिशाेबाने एका वर्षात या परिसरातील झाडे १ लाख ४३ हजार किलाे सीओटू शाेषून घेतात. याचा अर्थ ६० वर्षात या झाडांनी ८५ लाख ८० हजार किलाे सीओटू शाेषून घेतला आहे. एका माहितीनुसार हा प्रकल्प ४४० एकरामध्ये हाेणार असल्याचे प्रस्तावित आहे. म्हणजे एका वर्षात ११ लाख ४४ हजार किलाे आणि या हिशेबाने ६० वर्षात ६ काेटी ८६ लाख ४० हजार किलाे कार्बन येथील झाडांनी शाेषून घेतला आहे. पुढच्या ३० वर्षाचा हिशाेब केल्यास ही झाडे ३ काेटी ४३ लाख २० हजार किलाे कार्बन भविष्यात शाेषून घेतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंटर माॅडेल स्टेशन झाल्यास २०५० पर्यंत ७५ लाख ६५ हजार १९६ किलाे कार्बन उत्सर्जन घटेल, असा दावा केला आहे. मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक कार्बन ही झाडे शाेषून घेणार आहेत, याचाही विचार व्हावा, असे आवाहन जयदीप दास यांनी केले आहे.
आता ऑक्सिजनचा विचार करू. एक सामान्य आकाराचे झाड एका वर्षात २६० पाऊंड म्हणजे ११८ लिटर ऑक्सिजन बाहेर साेडते. बाजारात ऑक्सिजनची किंमत ८००० रुपये प्रती ४० लिटर आहे. म्हणजे एक झाड एका वर्षात २४००० रुपयाचे ऑक्सिजन नि:शुल्क देते. अजनीतील ७००० हजार झाडांचा हिशाेब केल्यास ही झाडे एका वर्षात १६ काेटी ८० लाख रुपयाचे ऑक्सिजन साेडतात. म्हणजे ६० वर्षात या झाडांनी १० अब्ज ८ काेटी रुपयाचे ऑक्सिजन नि:शुल्क दिले आहे. येत्या ३० वर्षात ही झाडे ५ अब्ज रुपयांच्यावर ऑक्सिजन नि:शुल्क देणार आहेत. म्हणजे प्रकल्पासाठी ही झाडे ताेडली तर आपण किती रुपयांचे नुकसान करणार आहाेत, याचा विचार करावा, असे आवाहन दास यांनी केले.