लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन गुंडांच्या सोमवारी रात्री झालेल्या वादात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पंकज नारायणरावजी कोंडलकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले आहे.पंकज एका लोहा कंपनीत काम करीत होता. तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. श्रीरामनगरातील पराते पेट्रोल पंपामागे राहणारा पंकजने गेल्या वर्षी नंदनवनमध्ये एकाची हत्या केली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो निर्ढावल्यासारखा वागत होता. त्याचे विशाल तुमडे नामक आरोपीसोबत वैर होते. विशालही गुन्हेगारी वृत्तीचा आहे. एक महिन्यापूर्वी त्यांच्यात कडाक्याचा वाद आणि हाणामारीही झाली होती. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना संपवण्याची धमकी देत होते. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास पंकज आणि आरोपी विशाल समोरासमोर आले. यावेळी विशाल सोबत त्याचे साथीदारही होते. बाचाबाची होताच विशाल आणि साथीदारांनी पंकजवर घातक शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी पळून गेले. नितीन रंगनाथ लाकडे (वय ३०) याने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. पोलिसांनी पंकजला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले. नितीन लाकडेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पाच संशयीतांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.
नागपुरात दोन गुंडांमध्ये वाद, एकाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 2:55 PM
दोन गुंडांच्या सोमवारी रात्री झालेल्या वादात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पंकज नारायणरावजी कोंडलकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे.
ठळक मुद्देहुडकेश्वर पोलीसांच्या हद्दीत थरारपाच संशयीत ताब्यात, चौकशी सुरू