ठळक मुद्देनासुप्रची कारवाई : सर्वधर्मीय समाजबांधवांचे सहकार्य
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नासुप्रच्या कार्यक्षेत्रातील नूर मशीद पाच झोपडा येथे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई सुरु केली असता नूर मशीद ट्रस्टच्या सदस्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना वेळ मागितला, नासुप्रद्वारे धार्मिक भावनेचा आदर करीत त्यांना वेळ देण्यात आला. त्यानंतर मुस्लीम बांधवानी नमाज पढल्यानंतर स्वत: मशीदमधील असलेले सामान व इतर वस्तू हटविल्या व मशीद रिकामी केली. त्यानंतर येथील अतिक्रमण काढण्यात आले. मुस्लीम बांधवानी सामंजस्य दाखवित कारवाईला सहकार्य केले.यासोबतच नासुप्र द्वारे विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करण्यात आली. यात मिनिमाता नगर येथून सोमवारी सुरू करण्यात आली होती. मंगळवारी संकटमोचन हनुमान मंदिर , साईबाबा मंदिर , गणेश मंदिर हनुमान मंदिर , राम मंदिर , हनुमान मंदिर , समाज भवन येथील गौतम बुद्धाची मूर्ती, चबुतरा आणि झेंडा भद्रकाली मंदिर जानकी नगर , पंचशील ध्वज, चबुतरा, हनुमान मंदिर स्वराज विहार वाठोडा , हनुमान मंदिर गोपाल कृष्ण लॉन वाठोडा , हनुमान मंदिर नं. १ गिडोबा रोड मंदिर , हनुमान मंदिर नं. २ गिडोबा रोड ,गिडोबा मंदिर गिडोबा चौक वाठोडा , नाग मंदिर बस्ती ,शिव मंदिर, जानकी नगर अशा एकूण १८ धार्मिक स्थळांच्या ठिकाणचे अतिक्रमण ४ टिप्पर आणि ३ जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले . रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. नागपुरातील नागरिक या कारवाई करता आता तयार झाले आहेत व नासुप्रच्या अधिकाºयांना या कारवाई दरम्यान सहकार्य करीत आहेत.अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी(पूर्व) भरत मुंडले, कनिष्ट अभियंता अविनाश घोगले, दीपक धकाते, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील व कळमणा आणि नंदनवन पोलीस विभागाच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली.