- आनंद डेकाटे
नागपूर - दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा हा २० सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी गुरूवारी विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले.
दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींगच्या विरोधात १ जुलै रोजी आंबेडकरी अनुयायांनी मोठे आंदोलन केले. त्या आंदोलनाची दखल घेत शासनानेही भूमिगत पार्किंग रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून दीक्षाभूमीवर सुरू असलेले काम बंद पडले आहे. परंतु भूमिगत पार्किंगसाठी करण्यात आलेले खोदकाम तसेच पडून आहे. २५ दिवस लोटले तरी खड्डा बुजवण्यात आलेला नाही. त्यामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे. हे साचलेले पाणी मुख्य स्मारकासाठी धोकादायक ठरू शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
१२ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्यावेळी दीक्षाभूमीवर लाखो लोक येतील. तेव्हा त्या दिवसाच्या १५ दिवसांपूर्वीपर्यंत येथील खड्डा बुजवून ती जागा समतल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, मुक्तिवाहिनी, रिपब्लिकन मुव्हमेंट आदींसह ४० विविध संघटनांचे प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने गुरूवारी एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीणा यांची भेट घेऊन याविषयावर सविस्तर चर्चा केली तसेच त्यांना निवेदन सादर केले. काही तांत्रिक बाबीमुळे खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली नसली तरी २० सप्टेंबरपर्यंत खड्डा बुजवण्यात येईल, असे यावेळी एनएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले. खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करा - भंते ससाईदीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करावी, अशा आशयाचे पत्र परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले आहे.