लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.गोंडवाना विद्यापीठात अनेक अभ्यासक्रमांचे पदव्युत्तर विभाग उपलब्ध नाहीत. तेथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची सहज संधी मिळावी यासाठी तेथील विद्यापीठ प्रशासनाने राज्यपालांकडे विनंती केली होती. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठात जे अभ्यासक्रम नाहीत, अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत पावले उचलावीत, असे निर्देश राज्यपालांना कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना दिले होते. राज्यपालांच्या या निर्देशांचे यंदाही पालन करण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठात सर्व विद्याशाखांचे पदव्युत्तर विभाग सुरू होईस्तोवर सदर आदेश कायम राहतील, असेही आदेशात नमूद केले होते. त्यानुसार, आॅगस्ट महिन्यात गोंडवानाच्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागांवर प्रवेशप्रक्रिया करण्यात येणार आहे.विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यशास्त्रे आणि आंतरविद्याशाखा कोर्सेसमध्ये २० टक्के अतिरिक्त जागा निर्माण केल्या आहेत. त्यात विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत आठ विभागांमध्ये ५९ जागा, मानव्यशास्त्रे विद्याशाखेतील आठ विभागांमध्ये ९२ जागा, आणि आंतरविद्याशाखा कोर्सेसच्या तीन विभागांमध्ये ६२ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने गोंडवानातील पदवीधरांसाठी २०० हून अधिक जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या जागा यंदाही कायम राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.