निशांत वानखेडे, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाचा २०२२-२३ या शैक्षणिक सत्राचा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी हाेणार असून भारताचे लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पहिला समाराेह पार पडला व काही माेजक्या विद्यार्थ्यांना पाेरिताेषिकांचे वितरण करण्यात आले हाेते.
दरम्यान शुक्रवारी अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे दुसऱ्यांदा २०२२-२३ या शैक्षणिक सत्राच्या परीक्षांमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदके व पारिताेषिके वितरित केले जाणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च दीक्षाभूमी नागपूर येथील विद्यार्थी प्रणय आनंद पवार याने याने एमबीए परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ७ सुवर्णपदके प्राप्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील विद्यार्थी ज्ञानेश्वर भागवत नेहरकर याने बीए एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके व २ पारितोषिके प्राप्त केले आहे. पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थिनी मेघा तेजवंत पोटदुखे हिने एमए (मराठी) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके व १ पारितोषिक प्राप्त केले आहे.
नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग येथील बहि:शाल विद्यार्थी सचिन चरणजी देव एमए (बुद्धिस्ट स्टडीज) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके प्राप्त केले आहे. पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी अजय अरविंद खोब्रागडे याने एमए (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक प्राप्त केले. नागपूर विद्यापीठाच्या स्वायत्त पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी प्राची हरीश त्रिवेदी हिने ४ सुवर्णपदके प्राप्त केले. स्वायत्त पदव्युत्तर औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थिनी स्नेहा संजय वट्टे हिने ३ सुवर्णपदके तर पदव्युत्तर शिक्षण विभागातील निखिल विनायक इंगळे याने ३ सुवर्णपदके प्राप्त केली आहे.
या साेहळ्यात एकूण १०१ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये १४२ सूवर्ण पदके, ८ रौप्य पदके व २५ पारितोषिके आदी एकुण १७५ पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाच्या स्वायत्त विभागातील ४४ विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके वितरित केले जाणार आहे. यामध्ये ५३ सुवर्णपदके व एक पारितोषिके आदी एकुण ५४ पुरस्कारांचा समावेश आहे.