लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९-२० या शैक्षणिक वर्षात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे; सोबतच नवीन अभ्यासक्रमदेखील सुरू होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन सत्रात नवीन महाविद्यालय उघडण्यासंदर्भात ४५ प्रस्ताव आले आहेत. जर असे झाले तर संलग्नित महाविद्यालयांची संख्या साडेसहाशेहून अधिक होऊ शकते.विद्यापीठाने बृहत् आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला ‘माहेड’ व राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर विद्यापीठाने नवीन महाविद्यालय व अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तसेच प्रवेशक्षमता वाढविण्यास इच्छुक असलेल्या संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. प्रस्ताव जमा करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर ही होती. या मुदतीपर्यंत विद्यापीठात ४५ प्रस्ताव जमा झाले. या प्रस्तावांची चाचपणी सुरू आहे. यानंतर हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येतील. आश्चर्याची बाब म्हणजे प्रस्ताव जमा करणाऱ्या सर्व संस्थांनी दावा केला आहे की, ते विद्यापीठाच्या नियमांनुसार महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करतील. याबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
व्यावसायिक अभ्यासक्रम नकोचआलेल्या प्रस्तावांपैकी एकही प्रस्ताव अभियांत्रिकी, एमबीए इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा नाही. एकाही व्यावसायिक महाविद्यालयाने जागा वाढविण्याचा प्रस्तावदेखील दिलेला नाही. सर्वाधिक प्रस्ताव पारंपरिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांचे आहेत. मात्र नवीन महाविद्यालयांसाठी शिक्षक कुठून आणणार, हा प्रश्न कायम आहे.