लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, अनेकांनी महाविद्यालयांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क भरलेले नाही. विद्यार्थ्यांची स्थिती समजून न घेता काही महाविद्यालये महाविद्यालय शुल्कासाठी त्यांची अडवणूक करीत आहेत. शुल्क भरल्यावरच परीक्षा अर्ज भरण्यात येईल, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. थकीत शुल्कासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. असे करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दिला आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र, अशा काळातही काही महाविद्यालये ही परीक्षा शुल्काच्या आड विद्यार्थ्यांकडून इतर शुल्कही जमा करीत आहेत. मार्च २०२० पासून महाविद्यालय बंद असल्याने ग्रंथालय, संगणक, आदी गोष्टींचा विद्यार्थ्यांनी वापरही केलेला नाही. तरीदेखील महाविद्यालयांकडून त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज काही महाविद्यालयांकडून अडविण्यात येत आहेत. यासंदर्भात सिनेट सदस्यांनी प्र-कुलगुरूंकडे तक्रारदेखील केली होती.
विद्यापीठाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. गुरुवारी या संदर्भात आदेश जारी करण्यात आले. महाविद्यालयांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क व शिक्षण शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी. तसेच परीक्षेचे अर्ज करण्यास विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये अशा सूचना दिल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे थकीत असलेल्या प्रवेश व शैक्षणिक शुल्काकरिता सहानुभूतिपूर्वक विचार करावा. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे थकीत असलेले शुल्क तीन ते चार हप्त्यांत भरण्याची सवलत देण्यात यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी प्राचार्य, विभागप्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.