लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे २० एप्रिलपर्यंत सव्वाशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज आले. आता छाननी प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र छाननीच्या वेळी पात्र उमेदवार निश्चितीच्या वेळी समितीची बैठक होणे आवश्यक आहे. मात्र लॉकडाऊनमुळे समितीच्या बैठकीत अडचण येण्याची शक्यता आहे, शिवाय इच्छुकांना अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे समितीकडे पाठविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णत: संपल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.निवड समितीने कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले होते व २० एप्रिलपर्यंत त्यांना अर्ज करता येणार होते. लॉकडाऊनमुळे विद्यापीठ व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे इच्छुकांना अर्ज भरताना नाहरकत प्रमाणपत्रासह इतर दस्तऐवज सादर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर नोडल अधिकारी डॉ. आर. प्रेमकुमार यांच्याकडे दस्तऐवजांची हार्डकॉपी पाठविण्याची मुभा निवड समितीने दिली आहे. सव्वाशेहून अधिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले.सर्वसाधारणत: अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी प्रक्रियेला सुरुवात होते व मग निवड समितीच्या बैठकीत पात्र उमेदवार निश्चित केले जातात. मात्र इच्छुकांची कागदपत्रे न पोहोचल्याने ही प्रक्रिया सुरू करणे शक्य नाही. या प्रक्रियेला लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू करता येणार नाही अशीच चिन्हे आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता अंतिम निवडीला जुलै ते ऑगस्ट महिना लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ. प्रेमकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.